मुंबई: गायक अभिजीत भट्टाचार्य आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, की अभिजीत विरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 'आप' नेत्या प्रीती मेनन यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


 

सोशल नेटवर्किंग वेबसाइट ट्विटरवर अपशब्द वापरल्याचा अभिजीतवर आरोप प्रीती मेनन यांनी केला आहे. यासंदर्भात प्रीती मेनन यांनी मुंबई पोलिसांना पुरावेही दिल्याचं समजतं आहे. त्यामुळे या प्रकरणी गायक अभिजीतचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

 

काय आहे प्रकरण:

 

पत्रकार स्वाती चतुर्वेदी आणि जनताकारिपोर्टर.कॉमच्या मुख्य संपादक रिफात जावेद यांना अभिजीत यांनी आक्षेपार्ह ट्वीट केले. चेन्नईतील इंजिनिअर तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुस्लिम असल्याचा दावा करत अभिजीत यांनी ट्वीट केलं. प्रत्यक्षात संशयित आरोपी मुस्लिम नसल्याचं वृत्त आहे.

 
अभिजीत धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा-सुव्यवस्थेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ट्वीट स्वाती चतुर्वेदी यांनी केलं. यामध्ये मुंबई पोलिसांना मेन्शन करुन अभिजीत विरोधात कारवाईची मागणीही त्यांनी केली.

 
यावरुन संतापलेल्या अभिजीत यांनी ‘निर्लज्ज म्हातारे’ अशा शब्दात स्वातींवर गरळ ओकली. तू पाकिस्तानींचे पंजे चाटत असल्याचं म्हणत अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केली. जनताकारिपोर्टर.कॉमच्या मुख्य संपादक रिफात जावेद यांनी या वादात उडी घेत ‘किती संस्कारी आहात’ असा खोचक टोला मारला. यावरही अभिजीतने ‘हो आम्ही भारतीय पाकिस्तानींना लाथ मारतो, हेच आमचे संस्कार आहेत’ असं प्रत्युत्तर दिलं.

 

मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवण्यास सांगितलं. त्याचप्रमाणे जवळच्या पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्लाही दिला.

 

दरम्यान याआधी देखील सोशल मीडियाच्या माध्यामातून अभिजीतनं अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यामुळे आता या तक्रारीनंतर अभिजीतवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

संबंधित बातम्या:

 

पार्श्वगायक अभिजीतचे महिला पत्रकारांना आक्षेपार्ह ट्वीट