मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा 'दंगल' गेल्या आठवड्यात चीनमध्ये रिलीज झाला. भारतासह परदेशात धुमाकूळ घातलेल्या या चित्रपटाने चीनमध्येही धमाकेदार एन्ट्री केली आहे. चीनच्या बॉक्स ऑफिसवर अवघ्या चार दिवसांत दंगलने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.


चीनमध्ये दंगलच्या जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे आमीरच्याच 'पीके'चा रेकॉर्ड मोडित निघाला आहे. 5 मे 2017 रोजी दंगल 'शुआई जिआओ बाबा' (बाबा, चला कुस्ती खेळू) या नावाने चीनमध्ये प्रदर्शित झाला. सात हजार स्क्रीन्सवर झळकलेल्या या चित्रपटाने मंगळवार संध्याकाळपर्यंत 120 कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याची माहिती आहे.

'चीनवासियांचं प्रेम पाहून मी भरुन पावलो आहे. मी चिनी सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचं भाषांतर करुन वाचत आहे. चिनी नागरिकांना भारतीय चित्रपटाशी एकरुप झाल्याचं पाहून कृतकृत्य झालो' अशा भावना व्यक्त करत आमीर खानने चिनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.

आमीर खानचा 'पीके' हा चीनमध्ये 100 कोटींची कमाई करणारा पहिला बॉलिवूडपट होता. 2015 मध्ये चीनमध्ये 16 दिवसात 'पीके'ने 100 कोटी जमवले होते. मात्र दंगलने अवघ्या चार दिवसांत हा आकडा गाठला. भारतात 'दंगल'ने 385 कोटींची कमाई केली होती.

दंगल हा चित्रपट कुस्तीगीर महावीर फोगट आणि त्यांच्या कन्या गीता आणि बबिता फोगट यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आमीर खानने यात मुख्य भूमिका साकारली असून फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, झायरा वसिम, साक्षी तन्वर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.