मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा नेहमी त्याच्या चित्रपटांद्वारे किंवा पाणी फाउंडेशनसाठी करत असलेल्या कामांमुळे लोकांसमोर येत असतो. आमिरने त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियाला रामराम ठोकला होता. पण, सोशल मीडियाला रामराम ठोकण्याआधीच सहा आठवडे त्याने मोबाईल फोन वापरणं बंद केलं होतं, असं त्याने माझा कट्ट्यावर सांगितलं. मोबाईल वापरणं बंद करण्याबाबत आमिर म्हणाला की, "सध्या आपल्याला मोबाईलची खूप सवय झाली आहे. पण पूर्वी आपण मोबाईल फोन वापरतच नव्हतो.मला असं जाणवलं की, मी मोबाईल फोनच्या खूप आहारी गेलोय. मी सतत फोनमध्ये घुसून असतो, ऑनलाईन बुद्धिबळ किंवा इतर ऑनलाईन खेळ खेळण्यात मग्न असतो,ऑनलाईन बातम्या बघतो, मित्रांच्या मेसेजला प्रत्युत्तर देतो किंवा 10-12 कौटुंबिक ग्रुपमध्ये अॅक्टिव्ह असतो. या सगळ्यामुळे मी दिवसभर खूप विचलित होतोय असं मला जाणवलं, त्यामुळे मी मोबाईल वापरणं बंद केलं".
आमिर म्हणतो, 'जेव्हापासून मी मोबाईल फोन वापरणं बंद केलं आहे, तेव्हापासून माझ्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत'. आमिर पुढे म्हणाला, जर माझ्याकडेफोन असता तर मी 28 जानेवारीपासून जो प्रवास केला आहे तो मी करूच शकलो नसतो.फोन सुरू असता तर हा पल्ला गाठायला मला दोन वर्ष लागली असती. पूर्वी मी गाडीत बसलेलो असताना मी फोनमध्ये रमलेलो असायचो.पण तेच आता मी माझ्या आयुष्याबद्दल, मुलांबद्दल, घरच्यांबद्दल, नवीन प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाबद्दल विचार करतो. पुस्तकं वाचतो. मोबाईल फोन नसताना मला जाणवतय मी किती मोठं पाऊल उचललय. फोन असताना मला या कशाची जाणीवच झाली नव्हती. मोबाईलफोन न वापरल्याने होणाऱ्या फायद्यांमुळे मी सोशल मीडियापासूनही दूर होण्याचा निर्णय घेतला.
आमिरला लोकांसोबत संवाद साधणं आवडतं. तसेच त्याचे अनेक उपक्रम लोकांना एकत्रित आणून केलेलेच आहेत. आमिर म्हणतो, 'मला जास्तीतजास्त तीन लोकांसोबतच संवाद साधायला आवडतं. मला गावात जाऊन लोकांना प्रत्यक्ष भेटायला आवडतं. टीव्हीवर यायलाही आवडतं. परंतु ऑनलाईन कोणतीही गोष्ट करायला आवडत नाही. त्यात मजादेखील येत नाही'.
आमिर आणि सोशल मीडिया...
आमिरला असं वाटतं की, सोशल मीडिया हे माध्यम त्याच्यासाठी नाही. अनेक जणं सोशल मीडियाचा चांगला वापर करत आहेत. सध्याच्याघडीला सोशल मीडिया हे एक उत्तम प्लॅटफॉर्म तयार झाले आहे. पण, आमिर मात्र यासगळ्यापासून दूर राहणंच पसंत करतो.
असा कोणता क्षण होता जेव्हा आमिरने सोशल मीडिया बंद करण्याचा निर्णय घेतला...
आमिर म्हणतो, "एकदिवशी मला जाणवलं की, मी सोशल मीडियावर खूपच जास्त अॅक्टिव्ह असतो. मी चित्रपट, सामाजिक कामं आणि फोनमध्ये खूप रमत चाललोय त्यामुळे माझं माझ्या मुलांवर अजिबात लक्ष नाही. म्हणून आता मुलांकडे लक्ष द्यायला हवं असा विचार करूनमोबाईल फोन बंद केला. मला कोणासोबत संपर्क साधायचा असेल तर माझ्यासोबत मॅनेजर, स्पॉट बॉय, सुरक्षारक्षक असतो. त्यांच्याकडे फोन असतोच. फक्त मी वापरत नाही".