Aamir Khan Mother Zeenat Heart Attack : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या चर्चेत आहे. आमिरच्या आईला म्हणजेच जीनत हुसेन (Zeenat Hussain) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रिपोर्टनुसार, आमिर खान पाचगणीत कुटुंबियांसोबत दिवाळी जल्लोषात साजरी करताना दिसून आला. दरम्यान जीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर आमिरने लगेचच त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात आणले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आमिरदेखील सध्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात आईसोबत आहे.
जीनत हुसेन यांची प्रकृती कशी आहे?
जीनत हुसेन यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. जीनत हुसेन यांच्या प्रकृतीसंदर्भात कोणत्याही अफवा आणि चुकीची माहिती न पसरवण्याचे आवाहन आमिर आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलं आहे.
एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार,"जीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं तेव्हा त्यांची प्रकृती खूप नाजूक होती. पण आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आईच्या प्रकृतीसंदर्भात प्रत्येक अपडेट आमिर डॉक्टरांकडून घेत आहे".
'कॉफी विथ करण'च्या एका भागात आमिर नुकताच दिसून आला होता. कार्यक्रमादरम्यान त्याने आईसंदर्भात भाष्य केलं होतं. आमिरला त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायला आवडतं. आई आणि मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल याकडे आमिरचं लक्ष असतं.
आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात आमिरसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत होती.
संबंधित बातम्या