मुंबई : अक्षय कुमारचा बहुचर्चित 'रुस्तम' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट ज्या नानावटी केसवर आधारित आहे, त्यावर मिस्टर परफेक्शनिस्टर आमीर खानला सिनेमा बनवायचा होता. 'बॉलिवूड लाईफ' या वेबसाईटने यासंदर्भात माहिती दिली आहे.


 
परफेक्शनिस्ट अशी ख्याती असलेल्या आमीरने या चित्रपटासाठी संशोधनालाही सुरुवात केली होती. 'नीरजा' फेम दिग्दर्शक राम माधवानी यांच्यासोबत आमीरने बोलणीही केली होती.

 
इतकंच नाही तर लंडनमध्ये राहणाऱ्या केएम नानावटी यांची पत्नी सिल्वियाशीही आमीरने संपर्क साधला होता. मात्र त्याचवेळी या केसवर दोन सिनेमांची घोषणा झाल्यामुळे आमीरचा उत्साह मावळल्याचं म्हटलं जातं. अक्षय-नीरज पांडेपाठोपाठ पूजा भट आणि सोनी राझदान यांनीही नानावटींवर चित्रपटाची घोषणा केली होती.

 

 

'रुस्तम' चित्रपट पाहून आमीरच्या टीममधील काही जणांचा भ्रमनिरास झाल्याचंही म्हटलं जातं. मूळ केसशी फारकत घेऊन चित्रपट बनवल्याचं म्हटलं जात आहे. आमीरने मात्र या केसवरील सिनेमाचं सोनं केलं असतं, अशा भावनाही व्यक्त केल्या जात असल्याचं 'बॉलिवूड लाईफ'च्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे.