मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे आता बॉलिवूडच्या दुनियेत अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. अनुराग कश्यपच्या 'निशांची' या चित्रपटाच्या माध्यमातून तो आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात करत आहे. या चित्रपटाचा अनाउन्समेंट व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओजच्या आगामी थियेट्रिकल चित्रपट 'निशांची' चा अनाउन्समेंट व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला. अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनात साकारलेला हा रॉ आणि ग्रिटी क्राईम ड्रामा चित्रपट, ऐश्वर्य ठाकरेच्या दमदार अभिनय डेब्यूची झलक दाखवतो. सोबत वेदिका पिंटो, मोनिका पवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांसारखे कसलेले कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

Nishanchi Movie : दोन भावांचे गुंतागुंतीचे आयुष्य पडद्यावर

'निशांची' एक प्रखर सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट आहे. दोन भावांच्या गुंतागुंतीचे आयुष्य त्यामधून मांडण्यात आलं असून त्यांनी घेतलेल्या निर्णयांनी त्यांच्या भवितव्याचे दिशा ठरते. या चित्रपटात गुन्हा आणि शिक्षा यामधील सूक्ष्म रेषा अगदी प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

अनाउन्समेंट एसेट प्रदर्शित होताच प्रेक्षक आणि सोशल मीडियावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेटिझन्सनी कमेंट सेक्शनमध्ये आपली प्रतिक्रिया देत चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

'निशांची' या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केलं असून, जार पिक्चर्स आणि फ्लिप फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने अजय राय आणि रंजन सिंह यांनी निर्मिती केली आहे. चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याच्याविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच आहे.

 

Who Is Aishwarya Thackeray : कोण आहे ऐश्वर्य ठाकरे? 

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा ऐश्वर्य ठाकरे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आहे. स्मिता ठाकरे या त्याच्या आई आहेत. मोठी राजकीय पार्श्वभूमी असतानाही ऐश्वर्य ठाकरेला राजकारणात कोणताही रस नाही. अभिनयाकडे ओढा असलेल्या ऐश्वर्य ठाकरेने तेच करिअर निवडलं. 

संजय लीला भन्साळीसोबत काम

ऐश्वर्य ठाकरेने या आधी संजय लीला भन्साळीसोबत 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली. या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ऐश्वर्यने जबाबदारी पार पाडली. आता निशांची चित्रपटाच्या माध्यमातून तो अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे.

ही बातमी वाचा: