Aadesh Bandekar : महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांचा लेक सोहम (Soham Bandekar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सोहमने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. सोहम सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असून सोशल मीडियाच्या माध्यमातून कशी बायको हवी याचा खुलासा केला आहे.


आदेश बांदेकर यांचे संपूर्ण कुटुंबच मनोरंजनक्षेत्रात अॅक्टिव्ह आहे. आता सोहमनेही या क्षेत्रात नशीब आजमवायला सुरुवात केली आहे. सोहम सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आस्क मी एनिथिंगचे सेशन घेतले होते. या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. 


सोहम बांदेकरला कशी पत्नी हवी? 


'आस्क मी एनिथिंग' या सेशनदरम्यान तुला बायको म्हणून कशी मुलगी हवी आहे? असा प्रश्न चाहत्याने विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत सोहम म्हणाला,"कशीही चालेल, आईला आवडली पाहिजे बस". सोहमच्या या उत्तराने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 


आदेश बांदेकरांना कशी सून हवी? 


सोहमच्या या उत्तरानंतर एबीपी माझाशी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले,"सोहम हा मम्माज बॉय आहे. श्यामच्या आईप्रमाणे सोहमची आई आहे. आदेश बांदेकर हा त्याचा जवळचा मित्र आहे, असं तो म्हणतो. आयुष्यात काही घडतय का असं मी काही दिवसांपूर्वी त्याला विचारलं. त्यावर गोड हसत म्हणाला, बाबा, ज्याक्षणी काही वाटेल तेव्हा तुला पहिलं सांगणार.  आईला आवडेल त्या मुलीसोबत लग्न करायचं हे त्याने ठरवलं आहे.  तर मी ठरवलं आहे की, त्या दोघांना आवडेल त्याला मी तथास्तु म्हणणार. लग्नाचा विचार त्याने करणं गरजेचं आहे. जर त्याने शेवटी मला शोधायला सांगितलं तर मग मी महाराष्ट्राला सांगणार दार उघड वहिनी दार उघड".


सोहमचं कौतुक करत बांदेकर पुढे म्हणाले," सोहमचं सध्या खूप उत्तम काम सुरू आहे. 'ठरलं तर मग'सारखी मालिका करतोय. 'लक्ष्य' मालिकेत त्याने अभिनय केला. तसेच सुचित्राच्या साथीने अख्ख प्रोडक्शन हाऊस तो स्वत: सांभाळत आहे".  


सोहम बांदेकरने 'नवे लक्ष्य' या मालिकेच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या मालिकेत त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. सध्या टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या 'ठरलं तर मग' या मालिकेची निर्मिती तो करत आहे. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमात त्याने सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाचीच भूमिका साकारली होती.


संबंधित बातम्या


Aadesh Bandekar Profile : नारळी पौर्णिमेला नारळ विकले, इलेक्ट्रिक तोरणांचा व्यवसाय, ढोलही वाजवले, लाडक्या आदेश भाऊजींचा 'होम मिनिस्टर'पर्यंतचा प्रवास