नवी दिल्ली : विलेज रॉकस्टार या आसामी चित्रपटाने 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मॉम चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. रिद्धी सेन यांना नगरकीर्तन या बंगाली सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.


नवी दिल्लीतील शास्त्री भवनमध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी ठसा उमटवला आहे.

नागराजला पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार

पिस्तुल्या, फँड्री, सैराट चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कारांवर ठसा उमटवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पुन्हा राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली आहे. नागराज मंजुळेंना पावसाचा निबंध या शॉर्ट फिल्मसाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.



कच्चा लिंबू सर्वोत्तम मराठी सिनेमा

अभिनेता प्रसाद ओकचं दिग्दर्शनातलं पदार्पण असलेल्या कच्चा लिंबू चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. मंदार देवस्थळी निर्मित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक रवी जाधव यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.



मराठमोळ्या अमित मसुरकरचा गौरव

मराठमोळा दिग्दर्शक अमित मसुरकरचा सिनेमा न्यूटनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रीय एकात्मतेसाठी नर्गिस दत्त पुरस्कार ठप्पा सिनेमासाठी निपुण धर्माधिकारी याला जाहीर झाला.



सर्वोत्कृष्ट बालपट म्होरक्या

स्वस्तिक प्रिती फिल्म प्रोडक्शन आणि अमर चित्रवाणी यांची निर्मित असलेला “म्होरक्या” हा दिग्दर्शक अमर देवकर यांचा पहिलाच चित्रपट आहे.

या चित्रपटाच्या पोस्टरनेच पिफ अर्थात पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये चर्चा रंगली होती. त्याचवेळी अनेकांनी हा सिनेमा राष्ट्रीय पुरस्कार मिळवेल असा अंदाज वर्तवला होता, तो खरा ठरला.

श्रीदेवीचा मरणोत्तर सन्मान

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मॉम चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मॉम हा त्यांच्या कारकीर्दीतील अखेरचा चित्रपट ठरला. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आहे.



महत्त्वाचे पुरस्कार :

सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) - विलेज रॉकस्टार (आसामी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - जयराज - (भयानकम् - मल्ल्याळम)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी (मॉम-हिंदी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - रिद्धी सेन (नगरकीर्तन- बंगाली)

दादासाहेब फाळके पुरस्कार - विनोद खन्ना

इंदिरा गांधी पुरस्कार - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण - पाम्पल्ली (सिंजर)

राष्ट्रीय एकात्मतेसाठी नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) - ठप्पा (मराठी)

सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट - आलोरुक्कम (मल्ल्याळम)

सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट - बाहुबली 2 (हिंदी)

सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धनावरील चित्रपट - इरादा (हिंदी)

सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - म्होरक्या (मराठी)

महाराष्ट्राचा ठसा :

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा लिंबू

सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - म्होरक्या

राष्ट्रीय एकात्मतेसाठी नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) - ठप्पा - निपुण धर्माधिकारी

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन (दिग्दर्शक - अमित मसुरकर)

स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - यशराज कऱ्हाडे (म्होरक्या)

सर्वोत्कृष्ट संकलन (नॉन फीचर) मृत्युभोज- द डेथ फॉरेस्ट

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) - पावसाचा निबंध - नागराज मंजुळे

सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण (शॉर्ट फिल्म) - पावसाचा निबंध - अविनाश सोनावणे

सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) - मयत - सुयश शिंदे

सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट - चंदेरीनामा- राजेंद्र जंगले

बॉलिवूडमधील पुरस्कार :


सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट - बाहुबली 2

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी (मॉम)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - दिव्या दत्ता (इरादा)

सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर-  ए.आर. रहमान (मॉम)

सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं - अब्बास अली मोगल (बाहुबली 2)

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली 2

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - गणेश आचार्य (गोरी तू लाथ मार - टॉयलेट एक प्रेम कथा)

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन

स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन- हिंदी)


इतर पुरस्कार :


सर्वोत्कृष्ट बालकलाकार - भानिता दास (व्हिलेज रॉकस्टार - आसामी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (येसूदास पुरस्कार)- विश्वपुर्वम मन्सूर

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - साशा तिरुपती (गीत- वान) (कात्रु वेल्लीदायी - तमिळ)

सर्वोत्कृष्ट संगीतकार - ए.आर. रहमान (कात्रु वेल्लीदायी - मणिरत्नम -तमिळ)

सर्वोत्कृष्ट गीतकार - प्रल्हाद (गाणं- मुथू रत्नदा प्याते) (मार्च 22 - कन्नड)

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - भयानकम्

सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा - भयानकम्

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा - थोंडिमुथलम द्रिक्षक्षियुम

स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - नगरकीर्तन (बंगाली)

स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - हेल्लो अर्सी (उडिया)- प्रकृती मिश्रा

सर्वोत्कृष्ट रंगभूषा - नगरकीर्तन (बंगाली)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा - नगरकीर्तन (बंगाली)


सर्वोत्कृष्ट संकलन - व्हिलेज रॉकस्टार (आसामी)

सर्वोत्कृष्ट (नॉन फीचर फिल्म) अॅनिमेशन फिल्म- फिश करी

सर्वोत्कृष्ट (नॉन फीचर फिल्म) दिग्दर्शनाचं पदार्पण - वॉटर बेबी - पिया शाह

सर्वोत्कृष्ट मानववंशशास्त्रावरील चित्रपट- नेम, प्लेस, अॅनिमल, थिंग

सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती - गिरीजादेवी डॉक्युमेंट्री

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर होते. दहा दिग्गजांचाही या समितीत समावेश आहे. 3 मे 2018 रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.