मुंबई : लग्नात नवरदेवाचे बूट लपवणं असो प्रत्येक सोहळा साजरा करण्याची हौस, 'हम आपके है कौन' चित्रपटाने सगळंच प्रेक्षकांना शिकवलं. सूरज बडजात्या दिग्दर्शित 'हम आपके है कौन' हा चित्रपट अजूनही जेव्हा टीव्हीवर लागतो तेव्हा प्रेक्षक तो पाहतातच. यावरुनच 25 वर्ष झाली तरी 'हम आपके है कौन'ची जादू अद्यापही ओसरलेली नाही.
या मल्टीस्टारर सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अगदी सिनेमातील 'टफी' हा कुत्रा सुद्धा भाव खाऊन गेला. 'हम आपके है कौन' मध्ये एकूण 14 गाणी होती. सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा 14 गाण्यांमुळे या सिनेमाला 'लग्नाची कॅसेट' म्हणून हिणवलं गेलं होतं. परंतु या सिनेमाने आणि सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कोणत्याही कौटुंबिक सोहळ्यात ही गाणी आजही ऐकू येतात.
बॉक्स ऑफिसवर एक अब्जांपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला जमवणारा पहिला हिंदी चित्रपट म्हणून 'हम आपके है कौन'ची ओळख आहे. या सिनेमाच्या पंचविशी अर्था रौप्यमहोत्सवानिमित्त 25 रंजक गोष्टी जाणून घेऊया.
1. 5 ऑगस्ट 1994 रोजी मुंबईतल्या लिबर्टी सिनेमामध्ये या 'हम आपके है कौन'चा प्रीमियर दणक्यात पार पडला. त्यानंतर त्याच थिएटरमध्ये हा सिनेमा तब्बल 100 आठवडे हाऊसफुल गर्दीत चालला.
2. 'हम आपके है कौन'.. 25 वर्षांपूर्वी आलेला हा सिनेमाने लोकप्रियतेच्या सगळ्या कक्षा तोडल्या. हाऊसफुल गर्दी खेचणारा हा सिनेमा 100 कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला सिनेमा मानला जातो.
3. बॉक्स ऑफिसवर 'हम आपके है कौन'नने अक्षरश: कहर केला. या सिनेमाची तब्बल साडेसात कोटी तिकीट्स विकली गेली.
4. 1996 पर्यंत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा म्हणून 'हम आपके है कौन'चं नाव गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदलं गेलं.
5. 1982 साली राजश्री प्रॉडक्शन्सने 'नदिया के पार' नावाचा सिनेमा बनवला. ज्यात सचिन पिळगांवकर मुख्य भूमिकेत होते. त्याच सिनेमाचा आधार घेत 1994 मध्ये जो सिनेमा आकाराला आला, तो म्हणजेच 'हम आपके है कौन'
6. सुरज बडजात्या या सिनेमाच्या कथेवर तब्बल 21 महिने काम करत होते. 21 महिन्यांच्या मेहनतीनंतर या सिनेमाची गोष्ट लिहून पूर्ण झाली.
7. 'इंडियन एक्स्प्रेस'च्या एका वृत्तानुसार माधुरी दीक्षितला या सिनेमासाठी तब्बल 2 कोटी 75 लाख रुपये मानधन म्हणून मिळाले होते. हे मानधन सलमान खानपेक्षा जास्त होतं असं अनुपम खेर यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं. अर्थात सलमान खानने ही गोष्ट फेटाळून लावली.
8. या सिनेमात एकूण 14 गाणी आहेत. एवढी गाणी असलेला हा पहिलाच सिनेमा होता. काहींनी तर हा सिनेमा पाहिल्यावर हा सिनेमा नसून चित्रहार असल्याची टीकाही केली होती. पण हिच गाणी या सिनेमाची ओळख बनली.
9. यातलं 'धिकताना' हे गाणं सूरज बडजात्यांचे आजोबा ताराचंद बडजात्या यांना प्रचंड आवडलं. इतकं की या सिनेमाचं नाव 'धिकताना' हे ठेवण्याचं जवळ जवळ नक्की झालं होतं.
10. या सिनेमातलं जवळजवळ प्रत्येक गाणं सुपरहिट झालं. या सदाबहार अल्बममधलं 'मुझसे जुदा हो कर तुम्हे दूर जाना है' हे गाणं सलमान खानचं आवडतं आहे.
11. 'हम आपके है कौन' म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतं 'दीदी तेरा देवर दिवाना' हे गाणं. सिनेमाची ओळख बनलेलं हे गाणं माधुरी दीक्षितसाठी खूप जवळचं आहे.
12. रेणुका शहाणेंसाठी हा सिनेमा वेगळ्या अर्थाने स्पेशल होता. कारण या सिनेमात त्यांनी पहिल्यांदाच डान्स केला. सिनेमातल्या इतर कोणत्याही सीनपेक्षा डान्सचं प्रकरण त्यांच्यासाठी कठीण होतं.
13. 'हम आपके है कौन' या सिनेमाची गाणी जबरदस्त लोकप्रिय झाली. एवढी की या सिनेमाच्या तब्बल सव्वा कोटी ऑडिओ कॅसेट्स विकल्या गेल्या.
14. या जबरदस्त यशामागे होतं एक मराठमोळं नाव रामलक्ष्मण. म्हणजेच विजय पाटील. रामलक्ष्मण यांनी 'हम आपके है कौन'ची गाणी संगीतबद्ध केली. या 14 गाण्यांसाठी दिग्दर्शकासोबत त्यांची जवळपास 50 सेशन्स पार पडली.
15. 'हम आपके है कौन' हा सिनेमा प्रेक्षकांनी थिएटरमध्येच येऊन बघावा यासाठी निर्माते आग्रही होते. त्यामुळे या सिनेमाची व्हिडीओ कॅसेट रिलीज न करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. तशा आशयाचं पत्र प्रकाशित करण्यात आलं होतं, ज्यावर संपूर्ण टीमच्या सह्या होत्या.
16. सिनेमाचं शूटिंग सुरु असताना सेटवर बाकीच्या मंडळींची धमाल सुरु असायची. ज्यांचं शूटिंग नाहीये त्यांच्यात क्रिकेटची मॅच रंगायची.
17. या सिनेमाने सलमान खानचा स्टारडम जबरदस्त वाढला. त्याने साकारलेला प्रेम चाहत्यांना प्रचंड आवडला पण गंमत म्हणजे हा रोल आधी आमीर खानला ऑफर केला होता. पण स्क्रिप्ट आवडली नसल्याने आमीरने हा सिनेमा नाकारला.
18. 'हम आपके है कौन' सिनेमाने त्यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्येसुद्धा बाजी मारली. सर्वात लोकप्रिय सिनेमा म्हणून 'हम आपके है कौन'ची निवड करण्यात आली.
19. बॉलिवूडमधला महत्वाचा मानला जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये 'हम आपके है कौन'ने 12 नामांकनं पटकावली, ज्यातल्या पाच पुरस्कारांवर या सिनेमाने नाव कोरलं.
20. 'दीदी तेरा देवर दिवाना' या गाण्यासाठी लता मंगेशकर यांना फिल्मफेअर घोषित करण्यात आला, पण त्यावेळी लतादीदींनी पुरस्कार घेणं बंद केलं होतं. मात्र या गाण्यावर चाहत्यांनी केलेल्या प्रेमाची भरपाई म्हणून त्यांनी हा पुरस्कार स्वीकारायचं ठरवलं.
21. या सिनेमात उटीचा कुठेही उल्लेख नसला तरी या सिनेमाचं संपूर्ण शूटिंग उटीमध्ये पार पडलं.
22. 'हम आपके है कौन'ने दक्षिण भारताचीही स्वारी केली. 'प्रेमालयम' या नावाने हा सिनेमा तेलुगू भाषेत रिलीज झाला. तिथेही तो 25 आठवडे हाऊसफुल चालला.
23. केवळ भारतातच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांना 'हम आपके है कौन'ने भूरळ पाडली. लंडनमधल्या बेलेव्ह्यू थिएटरमध्ये हा सिनेमा तब्बल 50 आठवडे चालला. गंमत म्हणजे निर्मात्यांनी हे थिएटर केवळ तीन आठवड्यांसाठी बूक केलं होतं.
24. टोरांटोमध्येही 'हम आपके है कौन'ची जादू पाहायला मिळाली. इथल्या या सिनेमाने 75 आठवडे पूर्ण केले. जे त्या काळात अनेक हॉलिवूडपटांनाही जमलं नव्हतं.
25. बॉलिवूड सिनेमाच्या इतिहासात 'हम आपके है कौन'ने आपलं नाव सुवर्णाक्षरात कोरलंय. सिनेमाची कथा, त्यातल्या कलाकारांचा अभिनय, त्याचं संगीत, त्याला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद, बक्कळ कमाई हे सगळंच शब्दांपलिकडचं आहे. आज या सिनेमाने पंचविशी गाठली असली तरी त्याचं ताजेपण आजही कायम आहे आणि कायम राहिल.
25 Years of Hum Aapke Hain Koun | 'हम आपके है कौन'चे 25 रंजक किस्से
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Aug 2019 03:35 PM (IST)
बॉक्स ऑफिसवर एक अब्जांपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला जमवणारा पहिला हिंदी चित्रपट म्हणून 'हम आपके है कौन'ची ओळख आहे. या सिनेमाच्या पंचविशी अर्था रौप्यमहोत्सवानिमित्त 25 रंजक गोष्टी जाणून घेऊया.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -