Bollywood Actor Struggle Life : मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) म्हणजे, हिंदी चित्रपटसृष्टीतील वर्सटाईल अभिनेता. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये मनोज वाजपेयी हे नाव अग्रस्थानी येतं. तीन दशकांहून अधिक काळापासून मनोज वाजपेयी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. या काळात त्यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपट बॉलिवूडला दिले. एवढंच काय तर, मनोज वाजपेयी यांनी मोठ्या दणक्या ओटीटीवर पदार्पण केलं. त्यांची 'द फॅमिली मॅन' ही वेब सीरिज विशेष चर्चित राहिली आहे. मनोज वाजपेयींच्या सर्वोत्तम चित्रपटांबाबत ज्यावेळी बोललं जातं, त्यावेळी एका चित्रपटाला विसरुन कसं चालेल, त्या चित्रपटाचं नाव म्हणजे, 'शूल'. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाशी संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही.


आत्तापर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट बनले आहेत, जे सुरुवातीला फ्लॉप ठरले आणि नंतर त्यांना कल्टचा दर्जा मिळाला. 'शोले'पासून 'अंदाज अपना अपना'पर्यंत असे अनेक चित्रपट होते, जे रिलीजच्या वेळी फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत, पण नंतर प्रेक्षकांनी या चित्रपटांना अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. या यादीत 'शूल' चित्रपटाचाही समावेश आहे. रिलीजच्या वेळी, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता, पण नंतर लोकांच्या प्रशंसेमुळे याचा समावेश कल्ट चित्रपटांच्या यादीत करण्यात आला.


शूलसाठी नवाजुद्दीननं घेतलेले फक्त 2500 रुपये...


'शूल' चित्रपटात मनोज वाजपेयींसोबतच नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील झळकला होता. नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील अनुभवी कलाकारांपैकी एक. आज नवाज कोट्यवधींची फी आकारतो. पण, स्ट्रगलिग पिरिअडमध्ये मात्र,अगदी थोडीशी रक्कम चित्रपटांसाठी मिळायची. 'शूल' चित्रपटासाठी नवाजला 2500 रुपये देण्याचं वचन दिलं होतं. या चित्रपटात त्यानं वेटरची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी नवाजुद्दीनचा आवाजही डब करण्यात आला होता. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही नवाजुद्दीनला पाहिजे तितकं फेम मिळू शकलं नाही.


सयाजी शिंदे यांना मिळाली ओळख...


शूल या चित्रपटाचं मुख्य आकर्षण होतं, तो खलनायक. या चित्रपटात सयाजी शिंदे यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. पहिल्या चित्रपटापासूनच त्यानं प्रेक्षकांवर खोलवर छाप सोडली. असं म्हटलं जातं की, त्यांची व्यक्तिरेखा बिहारचे बलवान नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यावर आधारित होती.


शिल्पाचं गाणं आजही सुपरहिट 


शूल चित्रपटातील 'यूपी-बिहार लुटणं' हे गाणे चार्टबस्टर ठरलं. शिल्पा शेट्टीनं आपल्या डान्सनं या गाण्याची नजाकत आणखीनच वाढवल्याचं बोललं जातं. या गाण्यातील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, हे गाण अजिबात कोरिओग्राफ केलेलं नव्हतं. कोरिओग्राफर अहमद खान यांनी सांगितल्यानंतर शिल्पा शेट्टीनं स्वत:च या गाण्यावर डान्स केला होता, असं सांगितलं जातं. 


राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या सहाय्यकाचं नशीब पालटलं


'शूल' चित्रपटाचं दिग्दर्शन ईश्वर निवास यांनी केलं आहे. सुरुवातीच्या काळात ते राम गोपाल वर्मा यांचे सहाय्यक म्हणून काम करायचे. असं म्हणतात की, त्या काळात ते डायरेक्टर ऑफिसमध्ये लोकांना चहा देत असत. मात्र, राम गोपाल वर्मा यांचा त्यांच्यावर पहिल्यापासून विश्वास होता. यामुळेच त्यांनी 'शूल' चित्रपटाची कमान ईश्वर निवास यांच्याकडे सोपवली. ही जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली आणि एक उत्कृष्ट चित्रपट बनवला. शूलनंतर त्यांनी 'लव लिए कुछ भी करेगा', 'दम', 'बरदश्त', 'दे ताल' आणि 'टोटल स्यापा' या चित्रपटांचे दिग्दर्शनही केलं.