नवी दिल्ली: फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे.
या यादीत यंदाही अभिनेता सलमान खानने पहिलं स्थान कायम राखलं आहे. 51 वर्षीय सलमान खान वार्षिक 232.83 कोटी रुपयांसह सेलिब्रिटी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे.
यंदा रिलीज झालेला ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा चालला नाही, तरीही सलमान कमाईमध्ये अव्वल ठरला आहे.
दुसऱ्या स्थानी शाहरुख
फोर्ब्सच्या या यादीत पहिले तीन सेलिब्रिटी हे यंदाही कायम आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील किंग खान शाहरुखने यंदाही हे स्थान अबाधित ठेवलं आहे. शाहरुख 170.50 कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे.
कोहली तिसरा, सचिना पाचवा, धोनी आठवा
सेलिब्रिटी श्रीमंतांच्या या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या वर्षाही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. कोहलीची वार्षिक कमाई 100.72 कोटी रुपये नोंदली गेली आहे.
दरम्यान, पहिल्या तीन क्रमांकावरील सेलिब्रिटी आपआपल्या स्थानी कायम असले, तरी यंदा त्यांच्या कमाईत 20 टक्क्यांनी घट झाल्याची नोंद फोर्ब्सने केली आहे.
दुसरीकडे कमाईच्या यादीत चौथ्या स्थानी अभिनेता अक्षय कुमार (98.25 कोटी), पाचव्या स्थानी सचिन तेंडुलकर (82.50 कोटी), आमीर खान (68.75 कोटी) सहाव्या, प्रियांका चोप्रा (68 कोटी) सातव्या, महेंद्रसिंह धोनी (63.77 कोटी) आठव्या, हृतिक रोशन (63.12 कोटी) नवव्या आणि अभिनेता रणवीर सिंह (62.63 कोटी) दहाव्या स्थानी आहे.