2 Years Of Dil Bechara: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' (Dil Bechara) रिलीज होऊन आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुशांतसोबत अभिनेत्री संजना सांघी (Sanjana Sanghi) मुख्य भूमिकेत दिसली होती. आता या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये या चित्रपटाची एक छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून सुशांतचे चाहते त्याच्या आठवणीत भावूक झाले आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. आज अभिनेता या जगात नसला तरी त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम जिवंत आहे. चाहते अभिनेत्याच्या आठवणी सतत सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता संजनाने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून चाहते आणखी भावूक झाले आहेत.
पाहा पोस्ट :
या व्हिडीओत संजनाने सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत देखील दिसत आहे. काही फोटोंमध्ये दोघे धमाल करताना दिसत आहेत, तर काहींमध्ये दिग्दर्शक मुकेश छाबरा सीन समजवून देताना दिसत आहेत.
व्हिडिओ शेअर करताना संजनाने लिहिले की, 'किझी आणि मॅनीच्या जादुई दुनियेला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत आणि ती कायम राहील. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. किजी बसूने कायमस्वरूपी मोकळेपणाने जगण्याचा मार्ग शिकवला आहे. तुझी खूप आठवण येते.' संजनाच्या या व्हिडीओवर कमेंट करून चाहतेही सुशांतची आठवण काढत आहेत.
सुशांतच्या आठवणीत चाहते भावूक
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या दोन महिन्यानंतर OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतरही चाहते खूप भावूक झाले होते. सुशांतचा हा चित्रपट 2014 मध्ये आलेल्या 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' हा चित्रपट जॉन ग्रीनच्या पुस्तकावर आधारित होता.
लॉकडाऊन दरम्यान, 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळला होता. पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आत्महत्या म्हटले होते. परंतु, त्याच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी त्याची हत्या झाल्याचे म्हटले होते.
हेही वाचा :
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतचे हे सिनेमे पाहिलेत का?
Sushant Singh : अभिनयासाठी सोडलं शिक्षण; इंजिनिअर ते अभिनेता, सुशांत सिंह राजपूतचा जीवनप्रवास