नवी दिल्ली : रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारकास्ट असलेला बिग बजेट सिनेमा 2.0 ने पाच दिवसात 100 कोटींच्यावर गल्ला कमावला आहे. फक्त हिंदीत डब झालेल्या चित्रपटाची ही कमाई आहे. गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 20.25 कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर पाचव्या दिवशी 2.0 ने शंभर कोटींचा टप्पा गाठला.


एकूण कमाई

2.0 या चित्रपटाची एकूण कमाई आतापर्यंत 111 कोटींपर्यंत पोहचली आहे. भारतात 337 कोटी तर भारताबाहेर 114 कोटी अशी जगभरात या चित्रपटाने 451 कोटी रुपये कमावले आहे. अशी माहिती स्वत: चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली आहे.

तीन भाषेत प्रदर्शित

2.0 हा चित्रपट 2010 मध्ये आलेल्या 'एंथिरन' या चित्रपटाचा सिक्वल आहे. लायका प्रोडक्शनद्वारा निर्मित हा चित्रपट आहे. हा चित्रपट 29 नोव्हेंबर रोजी तमिळ, तेलगू, आणि हिंदी या तीन भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता.

अक्षय कुमारचा पहिला  दक्षिणात्य चित्रपट

रजनीकांतने या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. रजनीकांतसह 2.0 मध्ये अक्षय कुमार, अॅमी जॅक्सन, आदिल हुसेन, आणि सुधांशु पांडे यांची प्रमुख भूमिका आहे. अक्षय कुमारचा हा पहिला दक्षिणात्य चित्रपट आहे. चित्रपटात अक्षयने खलनायकाची भूमिका साकारली आहे. तर रजनीकांत वैज्ञानिक आणि रोबोची भूमिकेत आहे.

चीनमध्येही प्रदर्शीत होणार

2.0 हा चित्रपट 2019 सालच्या मे महिन्यात चीनमध्येही प्रदर्शीत होणार आसल्याची माहिती लायका प्रोडक्शनने ट्वीट करुन दिली आहे. चीनमधील 10 हजार चित्रपटगृहात 57 हजार स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शीत केला जाणार आहे. 57  हजार स्क्रीन पैकी 47 हजार स्क्रीन या थ्री डी असतील.