नवी दिल्ली :  'ग्रेट ग्रँड मस्ती' सिनेमा प्रदर्शनाच्या 15 दिवस आधीच लीक केल्याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पेन ड्राईव्हच्या माध्यमातून 'ग्रेट ग्रँड मस्ती'ची सेन्सॉर कॉपी लीक केल्याचा आरोप या 12 जणांवर आहे.

 

‘मस्ती’ चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ग्रेट ग्रँड मस्ती या सिनेमाची सेन्सॉर कॉपी प्रदर्शनापूर्वी लीक झाल्याची धक्कादायक माहिती, दोन दिवसांपूर्वीच समोर आली होती.
ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट 22 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या जवळपास 17 दिवस आधीच त्याची सेन्सॉर कॉपी ऑनलाईन लीक झाली. विशेष म्हणजे उडता पंजाब या चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लीक झाल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आला आहे.

 

टोरंटवर सिनेमाची कॉपी उपलब्ध झाल्यानंतर अनेकांनी तो डाऊनलोड केला. तर अनेक जणांनी ट्विटरवर हे फोटो शेअर करत संतापही व्यक्त केला.
ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटात मस्ती सिनेमातील त्रिकूट विवेक ऑबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांची प्रमुख भूमिका आहे. तर उर्वशी रौतेला, श्रद्धा दास, पूजा चोप्राही यात दिसणार आहे. मस्ती आणि ग्रँड मस्ती नंतर या सीरिजमधील ग्रेट ग्रँड मस्ती हा तिसरा चित्रपट आहे.

 

आधी सैराट या मराठी सिनेमाची सेन्सॉर कॉपी लीक झाली होती. त्यानंतर उडता पंजाब, सुलतान आणि आता ग्रेट ग्रँड मस्ती लीक झाला आहे.

 

ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट प्रदर्शनाच्या कित्येक दिवस आधीच ऑनलाईन लीक झाल्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायावर मोठा परिणाम होईल असं मानलं जात आहे.