bollywood : अमिताभ बच्चनसोबत 'Shahenshah' आणि संजय दत्तसोबत 'गुमराह' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत झळकलेले महेश आनंद हे 80-90 च्या दशकातील सर्वात यशस्वी खलनायकांपैकी एक होते. ते कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट होते. अभिनय सुरू करण्यापूर्वी ते मॉडेल आणि प्रशिक्षित नृत्यकार देखील होते.

बॅकग्राऊंड डान्सर म्हणून सुरुवात

महेश आनंद यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली. 1982 मध्ये आलेल्या कमल हासन आणि रीना रॉय यांच्या 'सनम तेरी कसम' या चित्रपटातील टायटल साँगमध्ये त्यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं. त्यानंतर 1984 मध्ये 'करिश्मा' चित्रपटातून त्यांनी अभियनात पदार्पण केलं. सुरुवातीला फारसा यश लाभलं नाही, पण अमिताभ बच्चनसोबत 'Shahenshah' चित्रपटात भूमिका मिळाल्यानंतर त्यांना खरी ओळख मिळाली.

त्यानंतर त्यांनी 'गंगा जमुना सरस्वती', 'तुफान' यासारख्या बच्चन यांच्या इतर चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या. काही वर्षांतच त्यांनी संजय दत्त, अक्षय कुमार, गोविंदा, शशि कपूर, सनी देओल, विनोद खन्ना, सलमान खान अशा मोठ्या अभिनेत्यांसोबत जवळपास ३०० चित्रपटांत काम केलं.

वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष

महेश आनंद यांचं व्यावसायिक आयुष्य यशस्वी असलं तरी वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी पाच वेळा विवाह केले आणि 12 महिलांना डेट केल्याची चर्चा होती. त्यांचा पहिला विवाह रीना रॉय यांची बहीण बर्खा रॉयसोबत झाला होता, मात्र घटस्फोट झाला.

नंतर त्यांनी 'मिस इंडिया इंटरनॅशनल' एरिका मारिया डिसूजा यांच्याशी विवाह केला, त्यांना एक मुलगाही आहे. 1999 मध्ये त्यांनी मधु मल्होत्रा यांच्याशी तिसरा विवाह केला. चौथ्या वेळेस अभिनेत्री उषा बच्चानी यांच्याशी विवाहबद्ध झाले, पण तोही विवाह फार काळ टिकला नाही. शेवटी, त्यांनी ‘लाना’ नावाच्या रशियन महिलेशी पाचवा विवाह केला.

गरीबी आणि एकटेपणाचं वास्तव

महेश आनंद यांना त्यांच्या जीवनात आर्थिक अडचणींनाही सामोरं जावं लागलं. इतक्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम करूनही एका टप्प्यावर त्यांच्याकडे पिण्याचं पाणी विकत घेण्यासाठीही पैसे उरले नव्हते.

त्यांनी फेसबुकवर लिहिलं होतं –

“माझे मित्र मला दारूडा म्हणतात. माझं कोणतंही कुटुंब नाही. माझ्या सावत्र भावाने माझी 6 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मी 300 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत, पण आज माझ्याकडे पिण्याचं पाणी घेण्यासाठीही पैसे नाहीत. या जगात माझा एकही खरा मित्र नाही. हे खूप दुःखद आहे.”

अंतिम दिवस आणि मृत्यू

महेश आनंद यांनी करिअरमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. 2019 मध्ये गोविंदाच्या 'रंगीला राजा' या चित्रपटात त्यांना एक छोटी भूमिका मिळाली, त्यामुळे थोडीशी आशा निर्माण झाली होती.

मात्र, चित्रपट रिलीज होऊन फक्त 22 दिवस झाले असताना, 9 फेब्रुवारी 2019 रोजी ते त्यांच्या घरात मृतावस्थेत सापडले. त्यावेळी त्यांच्या शेजारी दारूची बाटली आणि अर्धवट खाल्लेली जेवणाची प्लेट होती. पोस्टमार्टम अहवालानुसार, त्यांचा मृत्यू होऊन तीन दिवस झाले होते. अधिकृतरित्या मृत्यूला नैसर्गिक म्हटलं गेलं, पण त्यांच्या शेवटच्या दिवसांतील वेदना अनेकांच्या काळजात घर करून गेल्या.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सलमानसोबत 'हम आपके हैं कौन'मध्ये सपोर्टिंग कलाकार, आता बनलाय टेलिव्हिजन क्षेत्रातील दिग्गज