Bollywood : 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम आपके हैं कौन' या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात अनेक अविस्मरणीय पात्रं निर्माण केली. त्यापैकी एक म्हणजे "घनश्याम" हे पात्र, ज्याला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली होती. हे पात्र अभिनेता दिलीप जोशी यांनी साकारलं होतं. जरी या भूमिकेला फारसं स्क्रीन टाइम नव्हतं, तरीही दिलीप जोशींच्या खास कॉमिक टाइमिंगमुळे हे पात्र लक्षात राहिलं.

आज दिलीप जोशी हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव बनले आहेत. त्यांचा शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. कधी काळी फक्त सहायक भूमिका करणारे दिलीप जोशी आज या मालिकेचा आत्मा बनले आहेत. त्यांच्याशिवाय हा शो अपूर्ण वाटतो.

"जेठालाल" नावाने घराघरात पोहोचले

2008 मध्ये सुरू झालेल्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेने दिलीप जोशी यांना “जेठालाल” म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आज जेठालाल हे नाव ऐकलं की त्यांच्या चालण्या-बोलण्याची शैली, गुजराती आणि हिंदी यांचा मिक्स संवाद, आणि त्यांची साधेपणाची वर्तवणूक आठवते. दिलीप जोशी यांचे प्रत्येक एक्स्प्रेशन प्रेक्षकांना हसवून जातं.

चित्रपट असो किंवा टेलिव्हिजन, दिलीप जोशी यांनी हे सिद्ध केलं आहे की भूमिका मोठी की छोटी याने फारसा फरक पडत नाही; ती भूमिका अभिनेता किती प्रामाणिकपणे आणि समर्पणाने करतो, हे खरे महत्त्वाचे असते.

‘हम आपके हैं कौन’ नंतर चित्रपटांमध्ये संधी मिळाली नाही

दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की 'हम आपके हैं कौन'सारख्या आयकॉनिक सिनेमात काम करूनही त्यांना पुढे फारसं काम मिळालं नाही. The Bombay Journey या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, "त्यावेळी मला पैशांची गरज होती म्हणून मी हा सिनेमा केला. सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आणि मला वाटलं की आता माझं नशीब बदलेल... पण तसं झालं नाही."

ते पुढे म्हणाले की, त्यांनी सलमान खानसोबत 'मैने प्यार किया' या सिनेमातही काम केलं होतं. मात्र तरीही त्यांना त्या यशानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारसं स्थान मिळालं नाही.

नाविन्याच्या जोरावर यश

दिलीप जोशी यांच्या प्रवासातून हे स्पष्ट होतं की, टॅलेंट आणि चिकाटी असेल, तर यशाचं दार उघडू शकतं. एका छोट्या भूमिकेपासून ते घराघरात पोहोचलेल्या जेठालालपर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायक ठरतो.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'सुपरस्टारच्या मुलाला माझ्यासोबत रात्र घालवायची होती, अभिनेत्री ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा