Bollywood Superstar Struggle Life: बॉलिवूडमधले (Bollywood News) काही स्टार तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले. पण, काही स्टार्सना रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यांचा हाच संघर्ष त्यांना इतरांपेक्षा वेगळा बनवतो. असाच एक अभिनेता म्हणजे, सुनील शेट्टी (Suniel Shetty) जो केवळ एक यशस्वी अभिनेताच नाहीतर, त्याच्या माणुसकीसाठीही ओळखला जातो. चाहत्यांच्या लाडक्या सुनील अण्णानं आपली ओळख फक्त बॉलिवूडपुरती मर्यादित ठेवलेली नाही. तो एक बिझनेस टायकून आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही ओळखला जातो. त्यानं आपल्या त्याच्या शरीरयष्टीसोबतच, त्याचा वेगळा आवाज आणि अॅक्शन सीन्सनी चाहत्यांना आपलं केलं. त्यानं 90च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पण, त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठं ध्येय सुपरस्टार बनणं कधीच नव्हतं, तर आपल्या वडिलांच्या संघर्षाचा आदर करुन त्यांच्या संघर्षाचं मोल त्यांना देणं हे होतं. आज या सुपरस्टारचा वाढदिवस आहे.
सुपरस्टार सुनील शेट्टीचा (Happy Birthday Suniel Shetty) जन्म 11 ऑगस्ट 1961 रोजी कर्नाटकातील मंगळुरू जिल्ह्यातील मुलकी शहरात झाला. हा अभिनेता एका मध्यमवर्गीय तुळू कुटुंबात जन्माला आला. त्याचे वडील वीरप्पा शेट्टी कामाच्या शोधात मुंबईत आले आणि येथे आल्यानंतर त्याने जुहू परिसरातील एका छोट्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. ते दिवसरात्र कठोर परिश्रम करायचे, टेबल साफ करायचे, प्लेट्स धुवायचे, एका हॉटेलातले वाढपी होते... आपल्या मुलांना चांगले भविष्य देण्यासाठी आणि कुटुंब चालवण्यासाठी या सर्व गोष्टी करायचे. त्यावेळी सुनील लहान होता, पण तो त्याच्या वडिलांचे कष्ट आणि संघर्ष जवळून पाहत होता . त्यामुळेच त्याला त्यांच्यासाठी आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं.
जिथे वडील काम करायचे, ते अख्खं हॉटेल विकत घेतलं
पण जेव्हा सुनील शेट्टीनं त्याच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं, तेव्हा त्यानं तेच हॉटेल विकत घेतलं, ज्यामध्ये त्याचे वडील काम करायचे. 2013 मध्ये त्याच्या नव्या डेकोरेशन शोरूमचे उद्घाटन करताना, सुनील शेट्टी म्हणालेला की, ही तीच जागा आहे, जिथे माझे वडील वीरप्पा शेट्टी वेटर म्हणून काम करायचे आणि प्लेट्स साफ करायचे.
सुनील शेट्टीचं बालपण अगदी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांप्रमाणेच गेलं. जुहूमध्ये राहून तो अनेकदा चित्रपटांचं शूटिंग पाहायचा आणि इथूनच त्याचा कल अभिनयाकडे वाढला. एक दिवस तो एका चित्रपटाचं शूटिंग पाहण्यासाठी गेला, जिथे अमिताभ बच्चन आणि झीनत अमान 'डॉन' चित्रपटाचं शूटिंग करत होते. त्याला बिग बींना भेटायचं होतं, पण गार्डनं त्याला अडवलं, पण जेव्हा अमिताभ यांची नजर त्याच्यावर पडली, तेव्हा त्यानं गार्डला आत पाठवायला सांगितलं. त्यावेळी बच्चन साहेबांनीही त्यांचा नंबर सुनीलला दिला, पण सुनीलनं कधीही फोन केला नाही. एकदा 'कौन बनेगा करोडपती'मध्ये आल्यानंतर त्यानं स्वतः ही कहाणी शेअर केली होती.
आजवरचे यशस्वी सिनेमे
सिनेसृष्टीचं कोणतंही पाठबळ मागे नसताना, त्यानं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि 1992 मध्ये 'बलवान' चित्रपटातून आपल्या बॉलिवूड कारकीर्दीला सुरुवात केली. ज्यामध्ये त्याची हिरोईन होती, दिव्या भारती. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला आणि प्रेक्षकांनी सुनील शेट्टीला डोक्यावर घेतलं. यानंतर त्यानं 'वक्त हमारा है', 'मोहरा', 'गोपी किशन', 'मुंगी', 'दिलवाले', 'सुरक्षा', 'बॉर्डर', 'रक्षक', 'भाई', 'पृथ्वी', 'कृष्णा', 'हेरा फेरी' अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा 'गोपी किशन' हा डबल रोल असलेला सिनेमा आजही प्रेक्षकांना खूप आवडतो, तर 'मोहरा'नं सुनील शेट्टीला सुपरस्टार बनायला मदत केली. 2000 मध्ये आलेल्या 'धडकन' या चित्रपटातील त्यांच्या 'देव' या ग्रे शेडच्या भूमिकेला खूप दाद मिळाली आणि या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार मिळाला.
सुनील शेट्टी त्याच्या कारकिर्दीत फक्त हिरोच्या भूमिकेपुरतं मर्यादित राहिला नाही. त्यानं खलनायक, कॉमिक आणि कॅरेक्टर रोल्समध्येही स्वतःला सिद्ध केलं. 'मैं हूं ना' मध्ये राघवनसारख्या दहशतवाद्याची भूमिका साकारून त्यानं दाखवून दिलं की, तो कोणताही रोल तितक्याच प्रभावीपणे साकारु शकतो. तसेच 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' सारख्या चित्रपटांमध्ये त्याचा विनोदी अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.
हिंदी व्यतिरिक्त, त्यानं मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. सुनील शेट्टी केवळ अभिनेताच नाही तर तो एक यशस्वी निर्माता देखील आहे. त्याने 'रक्त', 'खेल', 'भागम भाग' आणि 'लूट' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली. याशिवाय तो वेब सिरीजच्या जगातही सक्रिय आहे. 2022 मध्ये 'धारावी बँक' मध्ये थलैवन आणि 2023 मध्ये 'हंटर - टूटेगा नही तोडेगा' मध्ये एसीपी विक्रम चौहानच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सुनीलला अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, झी सिने पुरस्कार, स्टारडस्ट पुरस्कार आणि दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
दरम्यान, सुनील शेट्टी यांनी 25 डिसेंबर 1991 रोजी गुजराती मुस्लिम कुटुंबातील मुलीशी लग्न केलं. मानाचं खरं नाव मोनिषा कादरी आहे. लग्नानंतर या जोडप्याला दोन मुलं झाली, मुलगी अथिया शेट्टी आणि मुलगा अहान शेट्टी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :