मुंबई : एम. एस. धोनी आणि केसरी चित्रपटातील अभिनेता संदीप नाहरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. मात्र संदीपने खरच आत्महत्या केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहे. मुंबईतील गोरेगाव येथील वसुंधरा अपार्टमेंटमध्ये त्यानी स्वत:ला गळफास घेत आत्महत्या केली आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपच्या पत्नीनं सांगितलं की, संध्याकाळी संदीप आपल्या रुममध्ये गेले आणि त्यांनी आतून दरवाजा लावून घेतला. मात्र, खूप वेळ झाला तरी ते बाहेर न आल्यानं पत्नीला संशय आला. तिनं दरवाजा ठोठावला मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं तिनं फ्लॅट मालक आणि संदीपच्या मित्रांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कारपेंटरच्या सहाय्यानं दरवाजा उघडण्यात आला. यावेळी संदीपनं गळफास घेतल्याचं दिसलं. संदीपला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर त्याला पुन्हा घरी आणण्यात आलं आणि संध्याकाळी 7.30 वाजता पोलिसांना यासंदर्भातली माहिती दिली गेली.
पोलिसांकडून संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून यासंदर्भात अधिक माहिती शवविच्छेदन अहवालातूनच स्पष्ट होईल असं डीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितलं आहे. संदीपच्या फेसबुक पोस्टबद्दल विचारले असता याबाबत तपास केला जाईल असंही ते म्हणालेत.
दरम्यान, फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या जोडीदारासोबतचे असणारे मतभेद संदीपने समोर आणले होते. त्याचसोबत आईवडिलांचे आभार मानत त्यांनी आपल्या गरजा कशा पूर्ण केल्यास आणि आपलं अभिनेता होण्याचं स्वप्न कसं पूर्ण केलं हेही यात सांगितलं आहे. इतकंच नाही तर मुंबई शहराचेही त्याने आभार मानले आहेत. त्यानं केलेली ही फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर एकाकी या अभिनेत्याच्या मृत्यूची येणारी चर्चा पाहता यामुळं कलाविश्वाला मोठा हादरा बसला आहे. संदीपनं सुशांतसिंह राजपूतसोबत एम. एस. धोनी चित्रपटात काम केलं आहे. त्यानं छोटू भैय्या ही भूमिका निभावली होती.
संबंधित बातम्या :