मुंबई : एकिकडे देशात कोरोना (Coronavirus) लसीच्या आपातकालीन वापरासाठी अधिकृत परवानगी मिळालेली असतानाच आता या प्रक्रियेला किती वेळ जाणार असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. देशात येत्या काही दिवसांमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. पण, यातही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही लस केव्हा पोहोचणार याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही. अशी परिस्थिती असतानाच एका बॉलिवूड अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आपण लस घेतल्याचं जाहीर केलं.
कोरोना लस घेत याबाबतची माहिती देणारी ही अभिनेत्री आहे, शिल्पा शिरोडकर. शिल्पानं एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यामध्ये आपण कोरोनाची लस घेतली असून पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती तिनं दिली. शिवाय युएई या देशाचे तिनं आभारही मानले.
Elon Musk ठरले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती; संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क
कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण आणि त्यावरील प्रतिबंधात्मक लसीच्या संशोधनाला आलेला वेग पाहता आतापर्यंत अनेक राष्ट्रांमध्ये कोरोनाच्या लसींना परवानगी देण्यात आली आहे. तर, काही राष्ट्रांमध्ये कोरोना लसींच्या लसीकरणासही सुरुवात झाली आहे. शिल्पा युएईमध्येच स्थायिक असल्यामुळं ही लस घेणं तिला सहज शक्य झालं.
शिल्पा शिरोडकर ही मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेची विजेती, अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिची बहीण आहे. या दोन्ही बहिणींनी कलाविश्वात एकाच सुमारास पदार्पण केलं होतं. पण, पुढं शिल्पानं चित्रपटांची वाट निवडली तर, नम्रताचा कल मॉडेलिंगकडे दिसून आला. शिल्पानं आतापर्यंत 'किशन कन्हैया', 'त्रिनेत्र', 'हम, दिल ही तो है', 'आँखें', 'पहचान', 'गोपी किशन', 'मृत्युदंड' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गज गामिनी या चित्रपातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.