Saina Teaser अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या आगामी सायना या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. The Girl on the Trainनंतर आता परिणीती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटातून झळकणार आहे.


चित्रपटाची पहिली झलक अर्थात चित्रपटाचा टीझर परिणीतीनं प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर सध्या कलाविश्वात अनेकांचं लक्ष वेधत आहे. सायना नेहवालच्या भूमिकेत झळकणाऱ्या परिणीतीनं या चित्रपटासाठी तिच्या शरीरयष्टीपासून ते अगदी चेहऱ्याच्या ठेवणीपर्यंत अनेक गोष्टींबाबतचे बारकावे टीपल्याचं दिसत आहे. सायनाप्रमाणेच हुबेहुब दिसणारी परिणीती क्रीडारसिकांच्याही मनाचा ठाव घेऊन जात आहे.


IN PICS | भावाच्या वाढदिवसानिमित्त सारा अली खाननं शेअर केले खास फोटो


जवळपास मिनीटभराहून आणखी काही सेकंदांसाठी चालणाऱ्या या टीझरमध्ये स्वप्नांचा पाठलाग करताना मागे वळून पाहणं तर दूर पण, नकारात्मक विचारही जवळपास भटकू द्यायचे नसल्याचा एक संदेश मिळत आहे. साचेबद्ध जीवनाला शह देत सायना नेहवाल नेमकी कशी घडली आणि तिनं या खेळामध्ये कशा प्रकारे नावलौकिक मिळवला यावर चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येत आहे.



बॅडमिंटन क्षेत्रात सायनाची कामगिरी, आतापर्यंत तिच्या वाट्याला आलेले यशापयशाचे क्षण, या प्रवासात तिच्या पालकांपासून ते अगदी प्रशिक्षकापर्यंतची भूमिका या सर्वच गोष्टींवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करण्यात येणार आहे. खुद्द परिणीतीनं या चित्रपटासाठी कमालीची मेहनत घेतली, अनेक प्रशिक्षण सत्रांमध्ये ती सहभागी झाली, एका खेळाडूचं जीवन ती या चित्रपटाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जगली.