मुंबई : अभिनेत्री (alia bhatt) आलिया भट्ट ही मागील काही दिवसांपासून कलाविश्वात अतिशय वेगानं यशशिखरावर पोहोचली आहे. पदार्पणाच्या चित्रपटापासून ते आतापर्यंत, आलियानं वेळोवेळी बहुविध भूमिकांना न्याय देत तिच्या अभिनयानं चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. काही दिवसांपूर्वीच एका लहानशा सुट्टीवरुन परतल्यानंतर तिनं पुन्हा आगामी चित्रपटाच्या कामात स्वत:ला झोकून दिलं. पण, सतत कामाच्या व्यापात झोकून देणं तिला महागात पडलं आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार रविवारी आलियाला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिला नॉशिया आणि हायपरअॅसिडीटीचा त्रास झाल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच दिवशी आलियाच्या प्रतृतीत सुधारणा झाल्यामुळं तिला लगेचच रुग्णालयातून रजाही देण्यात आली. ज्यानंतर तिनं फारसा वेळ न दवडता काही तासांच्या विश्रांतीनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा 'गंगुबाई काठियावाडी' या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सुरु केलं.


'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यापासूनच त्याबाबतच्या बऱ्याच चर्चा रंगू लागल्या. यंदाच्या वर्षीच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचाही समावेश आहे. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात हा चित्रपट साकारला जात आहे. जिथं आलिया पहिल्यांदाच त्यांच्यासोबत काम करणार आहे. या चित्रपटातून आलिया मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. यंदाच्याच वर्षी दिवाळीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.





भन्साळींच्या या चित्रपटाव्यतिरिक्त आलिया यंदाच्या वर्षी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातूनही झळकणार आहे. प्रियकर रणबीर कपूर याच्यासोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं आलिया, रणबीरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना पाहता येईल असं चित्र आहे. याशिवाय दाक्षिणात्य कलाविश्वातही पदार्पणासाठी आलिया सज्ज आहे. एसएस. राजामौलींच्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या RRR या चित्रपटासाठी तिची वर्णी लागली आहे. त्यामुळं हे संपूर्ण वर्ष पाहता, आलिया बहुतांशी तिच्या कामाच्या व्यापातच व्यग्र असेल हे खरं.