मुंबई : अभिनेत्री (alia bhatt) आलिया भट्ट आणि अभिनेता (ranbir kapoor) रणबीर कपूर यांच्या नात्याची चर्चा आता कोणासाठीच नवी नाही. 2017 पासून एकत्र असणारी ही जोडी प्रत्येक वेळी साऱ्यांच्याच नजरा वळवत असते. अगदी एखाद्या पुरस्कार सोहळ्यात आपल्या साथीदाराच्या कामाचं कौतुक करणं असो किंवा मग त्याच्या यशात आपलाही आनंद मानणं असो, रणबीर आणि आलियानं कायमच सर्वांना खऱ्या अर्थानं कपल गोल्स दिले आहेत. अशी ही सेलिब्रिटी जोडी विवाहबंधनात कधी अडकणार हाच सर्वांना प़डलेला प्रश्न.


काही दिवसांपूर्वीच रणबीरनं एका मुलाखतीदरम्यान त्याच्या (आलियासोबच्या) लग्नाबाबत लक्षवेधी वक्तव्य केलं होतं. कोरोना महमारीचं संकट नसतं तर एव्हाना आम्ही विवाहबंधनात अडकलो असतो, असं तो म्हणाला होता. बरं त्या चर्चा शमत नाहीत तोच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ही जोडी राजस्थानच्या दिशेनं रवाना झाल्याचं म्हटलं गेलं.


आता म्हणजे 'मोस्ट हॅपनिंग कपल' म्हणून ओळखली जाणारी ही जोडी साखपुडा करुनच परतणार आहे. 'बॉलिवूड हंगामा'च्या वृत्तानंतर रणबीर आणि आलिया 30 डिसेंबरला साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.


दरम्यान, या चर्चांना वाव देणारी कारणंही तशीच आहेत. रणबीर आणि आलियाचे कुटुंबीय जयपूरला पोहोचले आहेत. शिवाय रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हेसुद्धा सध्या तिथंच आहेत. इतकंच नव्हे तर, रणबीरचा खूप चांगला मित्र दिग्दर्शक अयान मुखर्जी ही जयपूरमध्येच आहे. यात भर म्हणजे सध्या गोव्यात असणारा करण जोहरही त्याच दिशेनं रवाना होणार असल्याचं म्हटलं जात आहे.



रणथंबोरमधील अमन हॉटेल येथे ही मंडळी थांबली असल्याची माहिती समोर येत आहे. सरत्या वर्षाच्या दिवसांत त्यांचं राजस्थानमध्ये जाणं हे नववर्षाच्या स्वागतासाठी असल्याचं म्हटलं गेलं. पण, त्यानंतर निकटवर्तीयांची उपस्थिती आणि ही घाईगडबड पुन्हा पुन्हा या सेलिब्रिटी जोडीच्या साखरपुड्याबाबतच विचार करायला चाहत्यांना भाग पाडत आहे. तेव्हा आता सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिलीये ती म्हणजे या गोड जोडीच्या सुरेख फोटोंची आणि अर्थातच साखरपुड्याच्या अधिकृत वृत्ताची.