मुंबई : निर्माता दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या बहुविध धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. पण, साधारण मागील वर्षभरापासून साऱ्या जगावर कोरोनाचं सावट आल्यामुळं याचे थेट परिणाम कलाविश्वावरही दिसून आले. गडेगंज निर्मिती खर्च असणारे अनेक मोठे चित्रपटही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. या साऱ्याचा परिणाम अर्थातच चित्रपटांच्या कमाईवरही झाला. यातच नुकतीच एक बातमी आली, ती म्हणजे निर्माता- दिग्दर्शक करण जोहर यानं त्याच्या 'तख्त' या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचा ध्यास सोडल्याची.
करणनं हा चित्रपट साकारण्याचा बेत रद्द केल्याचं म्हटलं गेलं आणि अनेकांनाच धक्का बसला. कारकिर्दीतील हा त्याचा मोठा निर्णयच मानला गेला. पण, अखेरीस या सर्व चर्चांच्या गर्दीत खुद्द करणनंच मौन सोडत 'स्पॉटबॉय ई'ला याबाबतची माहिती देत नेमकं चित्र स्पष्ट केलं.
'तख्त'बाबत होणाऱ्या सर्व चर्चा खोट्या असून, हा चित्रपट रद्द करण्यात आला नसल्याचं त्यानं सांगितलं. असं असलं तरीही चित्रपट काहीसा लांबणीवर नक्कीच गेला आहे ही बाबही त्यानं स्पष्ट केली. मल्टीस्टारर अशा या चित्रपटाची घोषणा करणनं 2019 मधील ऑगस्ट महिन्यात केली होती. ज्यानंतर मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यानं या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे संकेतही दिले. पण, दरम्यानच्या काळात कोरोनाचं संकट आलं आणि सारी गणितं चुकली.
कोरोनाच्या या संकटातून काहीशी उसंत मिळालेली असताना आणि अनेक व्यवहार पुन्हा सुरळीत होत असतानाच धर्मा प्रोडक्शन्सकडून 'जुग जुग जियो', 'ब्रह्मास्त्र' अशा चित्रपटांना प्राधान्य देण्यात येणार आहे ज्यांची कामं अर्ध्यावर आली आहेत. ही कामं मार्गी लागून पूर्णत्वास नेल्यानंतर करण जोहर त्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टवर म्हणजेच 'तख्त' या चित्रपटावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
'तख्त'मध्ये कलाकारांची मांदियाळी
करणनं फार सुरुवातीलाच या चित्रपटातील स्टारकास्ट सर्वांपुढं आणली होती. ज्यामुळं प्रदर्शनापूर्वीच कलाविश्वात या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. मुघल साम्राज्यातील दोन मोठी नावं, औरंगजेब आणि दारा शिकोह यांच्यामधील धगधगतं नातं या चित्रपटातून साकारण्यात येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, विकी कौशल, अनिल कपूर, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर, आलिया भट्ट, करिना कपूर हे कलाकार झळकणार आहेत.