नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने आता देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. शेतकरी आंदोलनासंदर्भात आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या ट्विटनंतर खळबळ उडाली आहे. आता अक्षय कुमारनेही या वादात उडी घेतली आहे. ही बाब इतकी वाढली आहे की आज परराष्ट्र मंत्रालयाने यावर अशा लोकांना सल्लावजा इशारा दिला आहे. अक्षय कुमार यांनी ट्वीट करुन परराष्ट्र मंत्रालयाला पाठिंबा दर्शविला आहे. अक्षय कुमार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलंय की जे लोक प्रकरणाला बिघडवू पाहत आहे, त्यांच्यापासून दूर राहावे.


अभिनेता अक्षय कुमारने आज ट्विटरवर लिहलंय की, "शेतकरी हा आपल्या देशाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतभेद निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी, सामंजस्य ठरावाचे समर्थन करा."




काही लोक अजेंडा चालवत आहे : परराष्ट्र मंत्रालय


शेतकरी आंदोलनाला संदर्भात परदेशात बसलेल्या काही शक्ती अजेंडा चालवत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, या विषयांवर कोणतेही मत देण्यापूर्वी, संपूर्ण माहिती मिळवणे चांगले. अर्धवट माहितीवर सोशल मीडियावर व्यक्त केलेल मत हे बेजबाबदार असल्याचा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.


परराष्ट्र मंत्रालय ट्विटरवर #Indiatogether #IndiaAgainstPropoganda हॅशटॅग प्रमोट करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानानंतर आज अनेक स्टार त्याचे समर्थन करत आहेत.


Farmers Protest India: शेतकरी आंदोलनाच्या बाजूने ग्लोबल सेलिब्रिटी, पॉपस्टार रिहानानंतर ग्रेटा थनबर्गकडून शेतकऱ्यांचं समर्थन


परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात काय म्हटले आहे?
"या विरोधाला भारताची लोकशाही नीतिमूल्ये आणि राजकारणाच्या संदर्भातून पाहिले पाहिजे. सरकार आणि संबंधित शेतकरी संघटना या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा बाबींवर भाष्य करण्यापूर्वी, आपण वस्तुस्थिती शोधून घ्यावी आणि मुद्द्यांविषयी योग्य ते समजून घ्यावे अशी आमची विनंती आहे. खळबळजनक सोशल मीडिया हॅशटॅग आणि टिप्पण्यांचे आमिष, विशेषत: सेलिब्रिटीज लोकांनी करणे योग्य नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.




शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहाना काय बोलली?
कॅरिबियन पॉप स्टार रिहानाने काल संध्याकाळी शेतकङऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली आणि लिहिले की, "आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे."