Bollywood Actor Struggle Life: जेव्हा जेव्हा बंगाली चित्रपटांचा (Bengali Movie) उल्लेख केला जातो, तेव्हा दिवंगत अभिनेते उत्तम कुमार यांचं नाव नक्कीच घेतलं जातं. त्यांना बंगाली चित्रपटांचे 'महानायक' म्हटलं जातं, पण त्यापूर्वी त्यांना 'फ्लॉप मास्टर जनरल' हा टॅग देण्यात आला होता. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांचे सलग सात चित्रपट फ्लॉप झाले, पण त्यांनी हार मानली नाही आणि पूर्ण मेहनत आणि समर्पणानं काम करत राहिले आणि लोकांच्या हृदयात आपली छाप सोडली.


उत्तम कुमार यांचं खरं नाव अरुण कुमार चॅटर्जी होतं. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1926 रोजी कोलकात्यातील अहिरिटोला भागात झाला. त्यांना लहानपणापासूनच कला आणि अभिनयाची आवड होती, पण शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टमध्ये काम केलं. तसेच, हळूहळू त्यांनी नाट्यक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आणि 1948 मध्ये 'दृष्टीदान' या चित्रपटानं त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटाला फारसं यश मिळालेलं नाही आणि त्यानंतरही त्यांचे पुढचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.


कधीकाळी 'फ्लॉप मास्टर जनरल' म्हणून ओळखले जाऊ लागले... 


उत्तम कुमारसाठी तो काळ खूप कठीण होता. सलग सात फ्लॉप चित्रपटांमुळे लोक त्यांना 'फ्लॉप मास्टर जनरल' म्हणू लागले. हा त्यांच्या लोकप्रियतेला आणि आत्मविश्वासाला मोठा धक्का होता, पण उत्तम कुमार यांनी हार मानली नाही. एक दिवस ते नक्कीच त्यांचे नशीब बदलतील असा त्यांचा दृढनिश्चय होता.


1952 मध्ये 'बसू परिवार' हा चित्रपट करताना त्यांच्या आयुष्यात मोठा बदल आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी झाला आणि या यशाने त्यांच्या कारकिर्दीला एक नवी दिशा दिली. या चित्रपटानंतर त्यांनी सतत अनेक यशस्वी चित्रपट दिले आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक बनले. त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की, लोक त्यांना 'महानायक' म्हणू लागले.


एक अभिनेत्री लकी चार्म ठरली आणि... 


उत्तम कुमार आणि सुचित्रा सेन ही जोडी बंगाली चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध जोड्यांपैकी एक होती. त्यांनी सुमारे 30 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं, त्यापैकी 29 चित्रपट सुपरहिट झाले. उत्तम कुमार यांनी स्वतः अनेक वेळा कबूल केलं आहे की, जर सुचित्रा सेन नसत्या तर ते सुपरस्टार झाले नसते. प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडली आणि त्यांच्या चित्रपटांमधील दोघांची केमिस्ट्री अजूनही लक्षात आहे.


1966 मध्ये सत्यजित रे यांच्या 'नायक' या चित्रपटानं त्यांच्या कारकिर्दीला आणखी उंचीवर नेलं. या चित्रपटात त्यांनी एका सुपरस्टारची भूमिका केली, जो त्यांच्या आयुष्यातील आणि ओळखीच्या प्रश्नांशी झुंजत आहे. लोकांनी या चित्रपटाचं खूप कौतुक केले. सत्यजित रे यांनी एका मुलाखतीत असंही म्हटलेलं की, उत्तम कुमार हे खरे सुपरस्टार आहेत, त्यानंतर हे नाव त्यांच्यासाठी एक ओळख बनले.


उत्तम कुमार यांनी हिंदी चित्रपटांमध्येही आपली छाप सोडली. त्यांचा 'अमानुष' हा हिंदी चित्रपट खूप आवडला. याशिवाय त्यांनी 'आनंद आश्रम', 'छोटी सी मुलकत', 'दूरियां' सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं.


त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. 1967 मध्ये त्यांना 'अँटनी फिरंगी' आणि 'चिदियाखाना' साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 2009 मध्ये भारतीय टपाल विभागाने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक टपाल तिकिटही जारी केले. कोलकाता मेट्रो स्टेशनचे नाव बदलून 'महानायक उत्तम कुमार मेट्रो स्टेशन' असे ठेवण्यात आले.


उत्तम कुमार यांचे 24 जुलै 1980 रोजी निधन झाले. 'ओगो बोधू सुंदरी' या त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना अचानक छातीत दुखू लागले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बंगाली चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का बसला.