नवी दिल्ली : अभिनेता सोनू सूद कोरोना काळात आपल्या सामाजिक कामांमुळं चांगलाच प्रसिद्धीस आला आहे. लॉकडाऊनमध्ये फसलेल्या मजुरांसाठी मसिहा ठरलेल्या सोनू सूदनं अनेक मजुरांना रोजगार देण्याचं देखील काम केलं आहे. एवढंच नाही तर सोनूनं गरीबांना रोजगार देण्याचं काम तर केलंच आणि मुलांच्या शिक्षणासाठी सामग्री देण्याचं काम सुरु केलं आहे. आता सोनूनं मुलांच्या उच्च शिक्षणासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे. त्याने मुलांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.


सोनू सूद आता मुलांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणार आहे. कारण त्या मुलांच्या शिक्षणात काही कमी पडू नये. सोनू सूदनं आपल्या आईच्या नावे ही स्कॉलरशिप सुरु केली आहे. सोनूनं एक ट्वीट करत म्हटलं आहे की, 'आपलं भविष्य आपली ताकत आणि मेहनतच सिद्ध करणार आहे. आपण कुठुन आलो, आपली आर्थिक स्थिती कशी आहे, याचा याच्याशी काही संबंध नाही. एक प्रयत्न आता मी करत आहे. शाळेनंतरच्या शिक्षणासाठी पूर्ण स्कॉलरशिप. ज्यामुळं तुम्ही आपलं उच्च शिक्षण पूर्ण करु शकाल, यासाठी scholarships@sonusood.me यावर मेल करा', असं सोनू सूदनं म्हटलं आहे.





 सर्वसामान्यांसाठी धावून जाणाऱ्या अभिनेता सोनू सूदला एका गोष्टीचं दुःख!


त्याने एक आणखी ट्वीट करत स्कॉलरशिपची घोषणा केली आहे. त्यात म्हटलं आहे की, 'हिंदुस्तान शिकेल तेव्हाच, जेव्हा शिक्षण चांगलं मिळेल, उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप लॉन्च करत आहोत. मला विश्वास आहे की आर्थिक अडचणींमुळं आपलं ध्येय गाठण्यास अडचणी येऊ नयेत, आपली एंट्री scholarships@sonusood.me वर पाठवा, मी आपल्यापर्यंत पोहोचेल, असं सोनूनं म्हटलं आहे.





कोरोनामुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकला, सोनू सूदची मागणी

माहितीनुसार ही स्कॉलरशिप मेडिसिन, इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, रोबोटिक अँड ऑटोमेशन, सायबर सेक्युरिटी, डाटा सायन्स, फॅशन, पत्रकारिता आणि बिझनेस स्टडीज अशा काही कोर्सेससाठी असेल. स्कॉलरशिपसाठी काही अटी देखील असतील. ज्या आधारे सोनू सूदकडून विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे.