मुंबई : बॉलिवूडचे स्टार्स म्हटलं की त्यांचे चाहते आले आणि परिणामी गर्दी आली. गर्दीमुळं नेहमीच सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न उभा असतो. मात्र काही सेलिब्रिटी असे आहेत जे स्वत:च्या सुरक्षेवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan)  यांच्या चाहत्यांबद्दल तर बोलायलाच नको. यामुळंच त्यांची सुरक्षा देखील तशीच तगडी आहे. त्यांच्याकडे त्यांची पर्सनल सेक्युरीटी आहे. त्यात जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) नावाचे एक मराठमोळे बॉडीगार्ड आहेत. ज्यांना नेहमीच बिग बींसोबत पाहिलं जातं. 


जितेंद्र शिंदे हे सावलीसारखे अमिताभ बच्चन यांच्या सोबत नेहमी दिसून येतात. शिंदे यांच्या पगाराबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.  जितेंद्र शिंदे यांचा पगार हा एखाद्या बड्या कंपनीच्या सीईओपेक्षाही अधिक आहे. त्यांच्या वेतनाचा आकडा थक्क करणारा आहे. एका  रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र वर्षाला दीड कोटी रुपये कमवतात. म्हणजे ते महिन्याला जवळपास 12 लाख रुपये इतका पगार घेत असल्याचं समोर आलं आहे. जितेंद्र शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून बिग बींना सुरक्षा पुरवत आहेत. शिंदे हे बिग बींच्या सोबत सावलीसारखे असतात. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं बारीक लक्ष असतं, तसेच चाहत्यांच्या गराड्यातून त्यांना बाहेर काढणं, सुरक्षा करणं अशी महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. 


जितेंद्र शिंदे यांची सिक्युरीटी एजन्सी देखील आहे. परंतु, अमिताभ यांच्या सुरक्षेसाठी ते स्वत: हजर असतात. अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील अत्यंत मोठे नाव. त्यांचा चाहतावर्गही जबरदस्त आहे. अशावेळी त्यांच्या सुरक्षेची अत्यंत मोठी जबाबदारी जितेंद्र शिंदे यांच्यावर असते. अमेरिकेचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता एलिजा वुड भारतात आला होता त्यावेळी देखील शिंदे यांनी त्यांना सुरक्षा पुरवली होती. अर्थात बिंग बी बच्चन यांच्या सांगण्यावरूनच शिंदे यांनी एलिजा वुडला सुरक्षा दिल्याची माहिती आहे. 


 बिग बीं सह अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, शाहरुख खान आणि सलमान खान असे अनेक बॉलिवूड स्टार आपल्या पर्सनल बॉडीगार्ड्सला तगडा पगार देत असल्याची माहिती आहे.