मुंबई : महानायक अमिताभ बच्चन कोणत्याही चित्रपटामध्ये झळकणार,असं जेव्हा जाहीर करण्यात येतं तेव्हापासूनच या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. मराठमोळा आणि अनेक पुरस्कारांना गवसणी घालणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याही आगामी ‘झुंड’ या चित्रपटातून बिग बी झळकणार असल्याची माहिती समोर आली, त्या क्षणापासूनच चित्रपट नेमका केव्हा प्रदर्शित होणार, याचीच उत्सुकता पाहायला मिळाली. चित्रपटाचा टीझरही चाहत्यांच्या भेटीला आला. पण, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मात्र लांबणीवर पडली होती. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.


काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझरनं चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचवली आणि अखेर आता हा चित्रपट यंदाच्याच वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अनेक तारखांच्या अंदाजानंतर आता अखेर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मुहूर्त मिळाला आहे.


बिग बींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार यंदाच्याच वर्षी 18 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबद्दल माहिती देताना अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, ‘कोविडनं आपल्याला अनेक झटके देत मागे आणलं. पण आता दमदार पुनरागमनाची वेळ आली आहे. आपण अखेर त्या दिवसांमध्ये परतलो आहोत.....’. बिग बींच्या या पोस्टनंतर अनेकांनीच कमेंट बॉक्समध्ये चित्रपटाच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित चित्रपट


विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपली अशी फुटबॉल संघ बनवला होता. याच एकंदर कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट साकारण्यात आला आहे.