Bhushan Kadu : अभिनेता भूषण कडू (Bhushan Kadu) हा काही वर्षांपासून कॅमेऱ्यापासून पूर्णपणे लांब होता. कारण भूषण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत कठिण काळातून जात होता. आर्थिक अडचणी, बायकोचं जाणं, मुलाची जबाबदारी अशा अनेक गोष्टींमुळे भूषण हा पूर्णपणे खचला होता. पण आता नव्याने उभं राहत, भूषण पुन्हा त्याचं कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय. लॉकडाऊनच्या काळात भूषणची पत्नी कादंबरी हिचं निधन झालं. त्यानंतर भूषणच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. यावेळी त्याला काही कलाकारांनी मदतीचा हात दिला त्याचप्रमाणे अनेकांनी पाठही फिरवली. अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) यांनी केलेल्या मदतीचा उल्लेखही भूषणने केला आहे.
अभिनेता भूषण कडूने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी त्याने या सगळ्या कठिण प्रसंगांविषयी भाष्य केलं आहे. यावेळी त्याने अनेक कलाकारांची नावं घेत त्यांचे आभारही मानले आहेत, 22 व्यावसायिक नाटकं, 7 ते 8 सिनेमे करणारा हा विनोदवीर मागील काही वर्ष त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठिण काळ अनुभवत होता.बायको गेल्यानंतर स्वत:ला सावरणं, मुलाची जबाबदारी निभावणं अशा अनेक गोष्टींविषयी भूषण पहिल्यांदाच व्यक्त झालाय.
विजय पाटकरांनी न सांगता एक रक्कम मला पाठवली - भूषण कडू
आयुष्यातल्या कठीण काळात मदत केलेल्यांविषयी कृतज्ञता यावेळी भूषणने व्यक्त केली आहे. त्याने म्हटलं की, 'अनिरुद्ध दुभाषी, सचिन बागवे अशी अनेक मंडळी पाठिशी उभी राहिलीत. माझ्या सासूबाई, माझा मेव्हणा अनेकांनी खूप खंबीर साथ दिली. आज सासूबाई आहेत, म्हणून मी माझ्या मुलाला त्यांच्याजवळ ठेवून बाहेर कामासाठी जाऊ शकतो. काही जणांनी खूप चांगली साथ दिली. पण काही जणांनी मात्र त्यांच्याकडे कुवत असूनही, शक्यता असूनही काहीच केलं नाही. तेव्हा जाणवलं की, तुमच्या चांगल्या काळात खूप माणसं तुमच्या सोबत असतात, पण वाईट काळात पटकन् माणसं साथ सोडून निघून जातात. पण काही हिंतचिंतक होते, काही ज्यांना आपलं हित झाल्यावर चिंता वाटते असेही होते. काही कलाकार मंडळींनी मला मदत केली. विजय पाटकरांनी तर न सांगता मला एक रक्कम पाठवली. त्यांना माहिती होतं, कारण प्रत्येक कलाकाराला प्रत्येकाचं दु:ख माहिती होतं. बरं ओळखीचे मित्रही होते, पण त्यांचीही हिच अडचण होती.'
स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला - भूषण कडू
पुढे भूषनने म्हटलं की, 'कोविडच्या काळात पूर्ण इंडस्ट्री बंद पडली होती. प्रत्येकाच्या आर्थिक अडचणी होत्या. माझंही तेच होतं. जेव्हा कादंबरी आजारी होती, तेव्हा रोज थोडा थोडा आर्थिक संचय वापरत होतो. पण एका वेळेनंतर तो देखील संपला. त्यानंतर आयुष्यात खरी ओढाताण सुरु झाली. खूप त्रासलो होतो, तेव्हा स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. कारण मुलाचं दु:ख पाहू शकत नव्हतो आणि त्याला काहीच देऊ शकत नव्हतो, याचं दु:ख होतं. मग एक दिवस ठरवलं की, हे सगळं संपवण्यासाठी स्वत:लाच संपवून टाकूया.'