Bhonga Marathi Movie : सध्या ‘भोंगा’ हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. याच चर्चेत आता एक नवा मराठी चित्रपट सामील झाला आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे भोंग्यांवरून आक्रमक झाली आहे. तर, आता मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या हस्ते ‘भोंगा’ (Bhonga) या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच आपले नाव प्रत्येक सिनेप्रेमींच्या हृदयावर कोरले आहे. या चित्रपटाची नवी रिलीज डेट या निमित्ताने जाहीर करण्यात आली.



नव्या रिलीज डेटसह चित्रपटाच्या पोस्टरचेही अनावरण करण्यात आले. मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या हस्ते या पोस्टरचे अनावरण झाले. या पोस्टर अनावरणाच्यावेळी बोलताना अमेय खोपकर म्हणाले की, ‘आज बोलावण्याचं कारणं की, लॉकडाऊनच्या काळात आम्ही चित्रपट रिलीज करणार होतो. मात्र, तो आता करत आहोत. चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण आम्ही आज करत आहोत. 3 मे रोजी तो चित्रपट रिलीज होईल. आम्ही विचार केला की, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. काही लोकांचे गैरसमज जरी असले तरी, या चित्रपटाच्या माध्यमातून दूर होतील. हा चित्रपट 2018ला तयार झालेला आहे. मात्र, कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शित करता आला नाही.’


काय आहे कथा?


'भोंगा' चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी आहे. एका कुटुंबातील चिमुकल्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर आजार झालेला असतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर आणखीन परिणाम होत जातो. बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव तर पाहतच असतो, हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले जातात अथवा चित्रपटात नेमके काय घडते, या भोवती चित्रपटाचे कथानक फिरते. याआधी हा चित्रपट 24 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे प्रदर्शन लांबणीवर पडले होते.


या चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली असून, या आशयघन चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली आहे. अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल कांबळे, श्रीपाद जोशी,अमोल कागणे, पवन वैद्य, आकाश घरत यांचाही अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा :