Bhata Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Film Industry) वेगवेगळ्या धाटणीचे विषय हे आवर्जून हाताळले जातात. फार कमी लोकांना माहीत असेलल्या बेलदार ह्या भटक्या जमातीतील लोकांचा संघर्षमय जीवनप्रवास आगामी ‘भाटा’ या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर) यांच्या हस्ते लाँच करण्यात आलंय. येत्या 28 ऑगस्टला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
व्ही. डी. एंटरटेनमेंट आणि मोरया उद्योग समूह यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून अरायव्हल स्टुडिओ प्रा. लि. या निर्मिती संस्थेने ‘भाटा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुनील आबा जाधव आणि विजय चंद्रकांत चव्हाण हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. रिजवान शेख, नितेश पराडकर, सुनील सुनील कातकर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. भरतराज नारायण यादव यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून सहदिग्दर्शन अक्षय सुतार यांचे आहे. या चित्रपटाची कथा विजय चंद्रकांत चव्हाण यांची आहे, तर पटकथा आणि संवाद शरद कारंडे यांचे आहेत. श्रेयस आंगणे यांनी चित्रपटाची गाणी लिहिली असून संगीतही त्यांचेच आहे तर छायाचित्रण हरेश सावंत यांचे आहे. .सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेते अरुण नलावडे, विजय कदम, अनिल नगरकर, लक्ष्मण देवभट, प्रशांत मोहिते अभिनेत्री रुपाली जाधव, प्रेमा किरण बालकलाकार तनिष्का जाधव यांचा दमदार अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे.
बेलदार हे भटक्या जमातीतील लोक असून ते अत्यंत हलाखीचे जीवन जगतात. कठोर परिश्रम करणं हेच त्यांच्या नशिबी असते आणि आपला दैनंदिन उदरनिर्वाह होणे हाच त्यांच्यासाठी एकमेव आनंद असतो. आपण केवळ दगड फोडण्यासाठीच जन्माला आलो आहोत, अशी धारणा या लोकांची असते. राणा हा त्यांच्यापैकी एक असा जिद्दी योद्धा आहे जो सर्व प्रतिकूल परिस्थितींचा धैर्याने सामना करतो. आपल्या मुलीला शिक्षण देऊन मोठं करण्याचं स्वप्न त्याचे असते,आता प्रश्न असा आहे की, समाज त्याला त्याची स्वप्ने पूर्ण करू देईल का? आपलं स्वप्न साकार करताना राणाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला हा चित्रपट पहाणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
