Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: आपण बऱ्याचदा सिनेमे मोठ्या स्टार्समुळे पाहतो. पण कधीकधी असे सिनेमे असतात, जे काही पात्रांमुळे आणि त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आपल्याशी जोडले जातात. असे कलाकार गर्दीतून वेगळे दिसतात, कारण ते त्यांच्या अभिनयानं कथेत खोली भरतात. त्यांची उपस्थिती चित्रपटाच्या आत्म्याला भर घालते, त्यांची भूमिका कितीही लहान असली तरीसुद्धा ते लक्ष वेधून घेतात. सिनेमातल्या स्टार्सपेक्षा हे अगदी लहानसं पात्र सिनेमाच्या कथानकात इतका प्राण ओततं की, अगदी सिनेमाचा केंद्रबिंदुचं बनतं. अशाच काही लक्षवेधी पात्रांमुळे सर्वांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री (Actress) म्हणजे, छाया कदम (Chhaya Kadam).
नुकत्याच आलेल्या 'भूतम भयम्' (Bhootam Bhayyam) सिनेमात छाया कदम कदम यांनी साकारलेली भूमिका लहान पण अगदी हादरवणारी आहे. त्यांच्या लूकमुळे त्यांना ओळखणंही कठीण झालंय. त्यांचा मेकअप इतका अप्रतिम करण्यात आलाय की, पाहताच क्षणी ओळखणं तर दूरच, पण धडकी भरते एवढं नक्की. याच सिनेमाच्या निमित्तानं छाया कदम यांनी नुकतीच गलाटा इंडिया (Galatta India)ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मुलाखतीत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना हिंदी बिग बॉसची ऑफर मिळाली होती, असा खुलासा केलाय.
गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कधी कोणत्या रिअॅलिटी शोची ऑफर आली आहे का? असा प्रश्न छाया कदम यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा कान्सला गेले तेव्हा मला हिंदी बिग बॉसकडून ऑफर आली होती, पण माझ्याकडूनच काही झालं नाही, असं सांगितलं.
अभिनेत्री छाया कदम नेमकं काय म्हणाली? (Chhaya Kadam On Hindi Bigg Boss Offer)
मुलाखतीत बोलताना मराठी अभिनेत्री छाया कदम म्हणाली की, "खरं सांगायचं तर, मला हिंदी बिग बॉसकडून ऑफर आली होती. पहिल्यांदा कान्सला गेलेली तेव्हा. त्यावेळी त्यांना खूप वाटत होतं की, मी बिग बॉसमध्ये सहभागी व्हावं. त्यांनी त्यांच्याकडून खूप प्रयत्न केले. परंतु माझ्याकडूनच काही झालं नाही. कारण मला असं वाटलं की, आता नाही करायचंय..."
तुमचा TRP वगैरे कमाल आहे, पण... : छाया कदम
"मला वाटतं की, काही पर्सनल गोष्टी माझ्या स्वतःच्या असतात. ज्या गोष्टी मी वैयक्तिकरित्या स्वतःजवळ ठेवल्या आहेत, त्या मी दुनियेला का सांगू? असं मला वाटतं, माहीत नाही हे चुकीचं असेल की नाही. त्यामुळे मला सध्या नाही करायचंय. पण लोक आनंद घेतात. कारण मी त्यांना सांगितलं की, तुमचा TRP वगैरे कमाल आहे. पण मला सध्या शो नाही करायचाय. मी नकार देतेय, पण माझी मावशी आहे ना, ती बिग बॉस रिपीटमध्ये बघते. माझं ऐकत नाही. मला सांगते-तुला माहितीये का तिने असं केलं. तसं केलं...", असं छाया कदम म्हणाल्या.
दरम्यान, छाया कदम यांच्या सिनेमांबाबत बोलायचं झालं तर, 'फँड्री', 'सैराट', 'न्यूड', 'जुड', 'गंगूबाई काठियावाडी', 'लापता लेडीज', आणि 'मडगाव एक्सप्रेस' यांचा समावेश आहे. तिनं 'हुतात्मा' वेब सीरिज आणि 'मेरे साई' या टीव्ही शोमध्येही प्रभावी भूमिका केल्यात. तसेच, छाया कदम यांना 'न्यूड'साठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळालेला. मिडिया रिपोर्टनुसार, आता छाया कदम नागराज मंजुळेंच्या आगामी मराठी सिनेमात झळकणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
