Bangladesh Protest :  बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराची (Bangladesh Violence) झळ हजारो निष्पापांना सहन करावी लागली आहे. राजकीय उलथापालथीत जमावाकडून हल्ले, हत्यांचे प्रकार सुरू आहेत. हिंसाचाराच्या आगीत पेटलेल्या बांगलादेशातून  आणखी एक घटना समोर आली आहे. बांगलादेशी चित्रपट निर्माते सलीम खान (Selim Khan) आणि त्यांचा मुलगा शांतो खान (Shanto Khan) यांची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. निर्माता असण्यासोबतच सलीम खान बांगलादेशातील चांदपूर उपजिल्हामधील लक्ष्मीपूर मॉडेल युनियन परिषदेचे अध्यक्षही होते.


एका वृत्तानुसार, सोमवारी 5 ऑगस्ट रोजी सलीम आणि शांतो घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर बलिया युनियन, फरक्काबाद मार्केटमध्ये संतप्त जमाव त्यांच्यासमोर आला. स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने पिस्तुलातून गोळ्याही झाडल्या, पण जवळच्या बागरा मार्केटमध्ये त्यांना पुन्हा जमावाचा सामना करावा लागला. संतप्त जमावाने सलीम आणि त्याचा मुलगा शांतो यांना बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली. 


भारतीय बंगाली चित्रपटसृष्टीसोबत संबंध


सलीम खान हे भारतातील बंगाली फिल्म इंडस्ट्री टॉलिवूडशीही संबंधित होते. टॉलिवूडमधील बड्या फिल्मस्टारपैकी एका अभिनेत्यासोबत त्यांनी 'कमांडो' या चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. 


'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, टॉलीवूडमध्ये सलीमचे सुमारे 10 चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या टप्प्यात होते आणि त्यात टॉलिवूडचे मोठे स्टार काम करत होते. टॉलिवूडशी संबंधित कार्यकारी निर्माता अरिंदम यांनी सोमवारीच सलीम यांच्याशी चर्चा केली होती. बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावर आधारित 'तुंगीपरर मिया भाई' (Tungiparar Miya Bhai) हा बांगलादेशी चित्रपट सलीमने दिग्दर्शित केला होता.


सलीम यांच्याविरोधात सुरू होता भ्रष्टाचाराचा खटला


चांदपूर नौदल हद्दीजवळील पद्मा-मेघना नदीतून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननात गुंतल्याचा आरोप सलीमवर होता. या अवैध धंद्यातून त्याने बक्कळ कमाई केली असल्याचा आरोप केला जात होता. या आरोपात  त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक आयोगात (एसीसी) खटलाही सुरू आहे.


चंदपूर सदर मॉडेल पोलिसांचे प्रभारी अधिकारी मोहम्मद शेख मोहसीन आलम यांनी सांगितले की, 'आम्हाला दोघांच्या मृत्यूची माहिती मिळाली, परंतु कोणीही आम्हाला माहिती दिली नाही. आमच्या सुरक्षिततेचा विचार करून आम्ही तिकडे गेलो नसल्याचेही त्यांनी सांगितले.