Ban The Family Man season 2 : मनोज वाजपेयी, दाक्षिणात्या अभिनेत्री समंथा अक्किनेनी, शारिब हाशमी आणि प्रियामणी स्टारर वेब सीरिज 'द फॅमिली मॅन 2' (The Family Man season 2) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तसेच आता हा वाद आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. बहुप्रतीक्षित वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर राज्यसभा खासदार वायको यांनी या वेब सीरिज बंदी घालावी अशी मागणी करणारे पत्र माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिले आहे. यापूर्वी एनटीकेचे संस्थापक सीमन यांनी देखील बंदी घालण्याची मागणी केली होती. आता स्वत: तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारला अधिकृतपणे पत्र लिहून या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
तामिळनाडू सरकारने सोमवारी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, या वेब सीरिजमध्ये ईलम तमिळला अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने सादर करण्यात आलं आहे. पत्रात पुढे म्हटलं आहे की, सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ट्रेलरचं ध्येय श्रीलंकेत ऐतिहासिक संघर्षात सामील असलेल्या ईलाम तमिळांची विश्वासार्हता संपवण्याचं आणि त्यासंबंधातील तथ्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचं आहे." तमिळ भावनांना ठेस पोहोचवल्याचा हवाला देत तमिळनाडू सरकारनं ही वेब सीरिज केवळ तमिळनाडू नाहीतर संपूर्ण देशात प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
तमिळनाडू सरकारनं लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटलं आहे की, "या शोच्या माध्यमातून लोकशाही लढा देण्यासाठी दिलेल्या ईलाम तमिळच्या बलिदानाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात पुढे असेही लिहिले आहे की, गौरवशाली तमिळ संस्कृतीचा अपमान करणारा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात मुळीच अर्थ नाही आणि म्हणूनच याच्या प्रदर्शनावर बंदी घालावी.
या पत्रात उदाहरण देत म्हटलं आहे की, "तमिळ अभिनेत्री समंथाला वेबसीरिजमध्ये दहशतवादी म्हणून सादर करणं म्हणजे जगभरात राहणाऱ्या तमिळ लोकांच्या अस्मितेवर थेट हल्ला आहे आणि अशी पक्षपाती आणि लबाडीची मोहीम कोणीही सहन करणार नाही."
केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात अधोरेखित केले आहे की, "'द फॅमिली मॅन 2' ने केवळ ईलम तमिळांच्या भावना दुखावल्या नाहीतर मोठ्या प्रमाणात तमिळनाडूच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आणि असा कार्यक्रम प्रदर्शित करण्यास परवानगी दिली गेली तर तामिळनाडूमध्ये शांतता व्यवस्था राखण्यात अडचण उद्भवू शकते."
दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये ‘द फॅमिली मॅन’ चे दिग्दर्शक राज आणि डीके यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या शोचे वर्णन अत्यंत संतुलित केले आहे आणि त्यांनी सर्व बाजूंकडे समान लक्ष दिलं असल्याचं म्हटलं आहे.
तमिळ अभिनेत्री समंथाच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून तमिळ लोकांच्या भावना दुखावण्याशी संबंधित प्रश्नावर राज आणि डीके यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, "ट्रेलरमध्ये दाखवलेल्या काही शॉट्सच्या आधारे लोक आपली मत बनवत आहेत. आमच्या शोच्या अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच लेखन करणारी टीमदेखील तमिळ आहे. आम्ही तमिळ लोकांच्या आणि तमिळ संस्कृतीच्या भावनांचा आदर करतो. आम्ही सर्वांना आवाहन करतो की, ही वेब सीरिज प्रदर्शित होण्यची वाट पाहा आणि त्यानंतर पाहा. आम्हाला खात्री आहे की, हे पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच कौतुक कराल."
मनोज वाजपेयी अभिनीत मोस्ट अवेटेड 'द फॅमिली मॅन 2' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात येणार आहे. सीरीजच्या पहिला सीझन पाहिल्यानंतर चाहते दुसऱ्या सीझनच्या प्रतिक्षेत होते. ट्रेलर पाहून चाहते आता सीरिज पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या सीझनमध्येही मनोज वाजपेयी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहेत. या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सिरीजच्या 9 भागांच्या नवीन सीझनमध्ये श्रीकांत मध्यमवर्गीय फॅमिली मॅन आणि गुप्तचर अशी दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :