मुंबई : भारतातल्या अत्यंत उत्तम अभिनेत्रींपैकी एक गणल्या जाणाऱ्या चरित्र अभिनेत्री सुरेखा सिक्री यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांना दोन दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने सिटी क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक असल्याचं बोललं जातं.
सुरेखा सिक्री हे नाव भारतीय सिनेसृष्टीला नवं नाही. 1980 च्या दशकापासून त्या मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. मम्मो, तमस, किस्सा खुर्सी का आदी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. तमस, मम्मो आणि बधाई हो या चित्रपटातल्या भूमिकांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. त्यांचं नाट्यक्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊन संगीत नाटक अकादमीनेही त्यांचा गौरव केला आहे. सुरेखा सिक्री हे नाव भारतीय सिनेसृष्टीला माहीत होतं. पण ते घराघरांत पोचलं ते बालिका वधू या मालिकेमुळे. 2008 मध्ये त्यांना या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टेली अॅवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं. 2011 मध्येही त्यांनी बालिका वधूसाठीच्याच भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला.
याशिवाय, सलीम लंगडे पे मत रो, रघू रोमियो, झुबैदा, नसीम, रेनकोट, मिस्टर एंड मिसेस अय्यर आदी चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी अनेक कलाकार प्रार्थना करत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना सकाळी ज्युस पित असताना अचानक ब्रेन स्ट्रोक आला आणि त्या खाली कोसळल्या. त्यांना यापूर्वी 2018 मध्येही एकदा ब्रेन स्ट्रोक येऊन अर्धांगवायू झाला होता. पण त्यातून त्या प्रयत्नपूर्वक बाहेर आल्या. त्यानंतर त्यांनी कामही सुरू केलं. पण अचानक पुन्हा एकदा तशीच घटना घडल्यामुळे चिंता वाढली आहे.
सिक्री यांच्या नर्सने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातही त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांच्या मेंदूत गाठी आढळल्या आहेत. औषधोपचारांनी त्या गाठी कशा विरघळतील यावर डॉक्टर लक्ष देत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्या आयसीयूमध्ये आहेत. आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.