Marathi Play : संगीत रंगभूमीवरचं मानाचं पान म्हणजे संगीत स्वयंवर हे नाटक. खाडिलकरांच्या धारदार लेखणीतून आणि तितक्याच कसदार दिग्दर्शनातून साकारलेल्या या नाटकाला बखलेबुवांच्या संगीतानं आणि बालगंधर्वांच्या (Balgandharva) अभिनयानं अजरामर केलं. मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ म्हणजे काय याचा जिवंत अनुभव म्हणजे हे नाटक होतं. याच वैभवशाली नाट्यकृतीची श्रीमंती दाखवणारा खास प्रयोग नुकताच पुण्यात पार पडला. रविवार 15 डिसेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात या वैभवशाली प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं.
बालगंधर्वांमुळे मराठी सिनेसृष्टीने संगीत नाटकांचा एक सुर्वणकाळ पाहिला. नुकताच पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 108 वर्षांपूर्वीच्या संगीत स्वयंवर नाटकाचा वैभवशाली प्रयोग पार पडला. यावेळी अगदी गंधर्वांच्या काळाचा अनुभव प्रेक्षकांना घेता यावा यासाठी बालगंधर्व यांचा शेला आणि महत्त्वाचे म्हणजे पुरणपोळीच्या जेवणाचा थाट देखील होता.
गंधर्वांच्या नाटकांची श्रीमंती
गंधर्वांच्या नाटकांच्या श्रीमंतची कालखंड पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी अगदी सगळ्याच गोष्टींचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रत्येक प्रेक्षकाला गजरा आणि महत्त्वाचं म्हणजे पॅरिस होऊन आणलेल अत्तर हाताला लावलं जात होतं. तो काळ उभा करायचा म्हणजे तसे सगळे वेश आणि दागिने सगळ्यात महत्त्वाचे असतात. या नाटकात बालगंधर्व यांनी साकारलेली रुक्मिणीची भूमिका अभिनेत्री अस्मिता चिंचाळकरने साकारली आहे. विशेष म्हणजे तिने या भूमिकेसाठी खरे दागिने परिधान केले होते.
विशेष म्हणजे या नाटकाचं महत्त्वाचं आकर्षण होतं ते म्हणजे बालगंधर्व यांनी 1916 मध्ये संगीत स्वयंवर नाटकात जो शेला परिधान केला होता तोच शेला या प्रयोगात परिधान करण्यात आला होता. भरजरी आणि चांदीचं काम असलेला हा शेला या नाटकासाठी वापरण्यात आला. बालगंधर्व यांच्या काळात आता सारखे हॉटेल्स आणि डेजर्ट उपलब्ध नसायचे त्यामुळे बालगंधर्व यांचं नाटक संपलं की सगळ्या प्रेक्षकांसाठी पुरणपोळीचा बेत असायचा.पुण्यातील सरपोतदार या कुटुंबियांकडे बालगंधर्व राहिले आहेत आणि पुना गेस्ट हाऊसचे सरपोतदार कुटुंब तेव्हा देखील नाटकानंतर जेवणावळी वाढायचे. या प्रयोगासाठी देखील नाटकाच्या प्रेक्षकांसाठी खास पुरणपोळीचा बेत आखण्यात आला होता.