मुंबई : कांतारा चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिनेता ऋषभ शेट्टी याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर टीका केली आहे. कन्नड अभिनेता आणि निर्माता ऋषभ शेट्टीने बॉलिवूड इंडस्ट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्री भारताला मोठ्या पडद्यावर चुकीच्या पद्धतीने दाखवते, असं त्याने म्हटलं आहे. ही बाब बॉलिवूडकरांना नक्कीच झोंबणारी आहे. ऋषभ शेट्टीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे.


अभिनेता ऋषभ शेट्टी बॉलिवूडवर भडकला


अभिनेता ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) कांतारा (Kantara) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. 2022 मध्ये आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला. केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने सुमारे 450 कोटींची कमाई केली. या चित्रपटासाठी ऋषभ शेट्टीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका ब्लॉकबस्टर ठरेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. ऋषभ शेट्टी सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान, त्याने बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे. यामुळेच तो आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. 


ऋषभ शेट्टी ट्रोलर्सच्या निशाण्यावर


ऋषभ शेट्टीने एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हिंदी चित्रपटांवर टीका करणारं वक्तव्य केलं आहे. ऋषभ शेट्टीने हिंदी आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये भारताच्या नकारात्मक प्रतिमेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूडवर निशाणा साधताना ऋषभ शेट्टी म्हणाला की, 'बॉलिवूड भारताला चुकीच्या प्रकाशात दाखवते.' त्याच्या या वक्तव्यानंतर ऋषभ शेट्टी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.  'मेट्रो सागा'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






हिंदी चित्रपटांवर अभिनेत्याची टीका


या मुलाखतीत ऋषभ शेट्टीने आंतरराष्ट्रीय चित्रपट कार्यक्रमांमध्ये बॉलिवूडकडून दाखवल्या जाणाऱ्या भारताच्या प्रतिमेवर निराशा व्यक्त केली आहे. अभिनेता ऋषभ शेट्टी म्हणाला की, "भारतीय चित्रपट, विशेषतः बॉलिवूड, भारताला वाईट प्रकारे दाखवतात. बॉलिवूड चित्रपटांना जागतिक कार्यक्रमांसाठी आमंत्रित केलं जातं आणि रेड कार्पेट दिलं जातात. माझं राष्ट्र, माझं राज्य, माझी भाषा-माझा अभिमान. जागतिक स्तरावर ते सकारात्मक पद्धतीने का घेतलं जात नाही आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करतो."


ऋषभ शेट्टीवर नेटकरी भडकले


ऋषभ शेट्टीच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया देत त्याच्यावर निशाणा साधला आहे. कांतारा चित्रपटातील काही सीन्सचा हवाला देत लोकांनी त्याला 'हिपोक्रॅट' देखील म्हटलं आहे. कांतारा चित्रपटामधील एका दृश्यात, ऋषभ शेट्टी एका महिलेच्या संमतीशिवाय तिच्या कंबरला चिमटा काढतो. या सीनचा दाखला देत ऋषभवर दुटप्पीपणाचा आरोप नेटकऱ्यांकडून होऊ लागला आहे.




'कांतारा 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 


कांतारा हिट झाल्यानंतर आता ऋषभ शेट्टी त्याचा दुसरा भाग म्हणजेच 'कंटारा 2' घेऊन येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कांतारा 2 चित्रपट 2025 मध्ये थिएटरमध्ये येऊ शकतो. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाचे चौथे शूटिंग शेड्यूल ऑगस्टच्या शेवटी सुरू होईल. या चित्रपटात ऋषभ पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार असून चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही स्वत:च्या खांद्यावर आहे.