Ajanta Elora International Film Festival 2025: जगभरातील चित्रपटप्रेमींमध्ये मानाचा समजला जाणारा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 15 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत हा महोत्सव होणार असून अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समितीनं या महोत्सवाची रुपरेषा सांगितली आहे. यात आशुतोष गोवारीकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.


या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल आणि मुख्य संरक्षक अंकुशराव कदम यांच्या नेतृत्वाखालील आयोजन समितीने महोत्सवाची माहिती दिली. आयोजक समितीने चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाबाबत सदस्यांची नावे जाहीर केली असून त्यात आशुतोष गोवारीकर आणि सुनील सुकथनकर या नामवंतांचा समावेश आहे.


लगान, स्वदेशसह अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचं दिग्दर्शन


आशुतोष गोवारीकर यांनी लगान, स्वदेश, जोधा अकबर, पानिपत अशा ऑस्कर नामांकीत सिनेमांचं दिग्दर्शन केलं असून चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातील हे मोठे नाव आहे. भारातीय सिनेमा ऑस्करपर्यंत पोहोचवणारे हे प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते आहेत. मागील २५ ते ३० वर्षांपासून भारतीय सिनेमाचं जगभरात उल्लेखनीय नाव होण्यात गोवारीकरांचा मोठा सहभाग आहे. गोवारीकर यांनी आपल्या अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती प्रक्रीयेने भारतीय चित्रपटसृष्टीत मागील तीन दशकांपासून भक्कम योगदान दिले आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आशुतोष गोवारीकर यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही छाप सोडली आहे.


महोत्सवाच्या संचालकपदी दिग्दर्शक सुनिल सुकथनकर 


अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली असून महोत्सवाच्या संचालकपदी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनिल सुकथनकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते सुनील सुकथनकर हे देखील या आवृत्तीसाठी महोत्सव संचालक म्हणून काम पाहतील. माजी दिग्दर्शक अशोक राणे यांच्या जागी, ज्यांचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. सुकथनकर यांनी गेल्या 30 वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 


कोण आयोजित करतं अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव?


नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठावाडा आर्ट कल्चर व फिल्म फाऊंडेशनच्या वतीने मागील ९ वर्षांपासून अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत केला जातो.   केंद्र सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदा या चित्रपट महोत्सवाचं १० वं वर्ष आहे.