मुंबई : बातमीचा मथळा आणि त्यावर दिलेला फोटो बघून ही बातमी तुम्ही वाचणार नाही असं होऊच शकत नाही. वाचायलाच लागती बातमी. कारण, आपली शेवंता परत येतेय.. आता ती येईल परत तेव्हा तिचा ठसका आणखी वाढणार आहे. तोरा आणखी बहरणार आहे. कारणच तसं आहे. नाही म्हणायला एकच गोष्ट नसणार आहे.


शेवंता बनलेल्या अपूर्वा नेमळेकरला रात्रीस खेळ चालेनं अमाप लोकप्रियता दिली. तिच्या अदांवर महाराष्ट्र फिदा झाला. तिची केसांची बट आणि बोलके डोळे पाहून घरातला प्रत्येकजण वेडावला. अपूर्वानेही या मालिकेबद्दल बोलताना हे मिळालेलं प्रेम अनपेक्षित असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मालिका संपली. मालिका संपायच्या आत शेवंताचा ट्रॅक संपला होता. पण ती गेल्यानंतर अनेक जण हळहळले होते. शेवंताची क्रेझ लक्षात घेऊन एक मालिका संपल्यावर तिला लगेच दुसऱ्या मालिकेत घ्यायची लगबग झाली नसती तरच नवल. म्हणूनच शेवंता फेम अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर तितक्याच मादक रुपात परतणार आहे.


पण यावेळी चॅनल वेगळं आहे. म्हणजे ते झीचंच आहे. पण ते मराठी नाही. म्हणजे झी मराठी नाही. ते आहे झी युवा. झी युवाच्या नव्या मालिकेत अपूर्वा नेमळेकर झळकणार आहे. तिच्या अदा आणि ठसका आणखी घायाळ करणारा असेल आणि तिचं रूपही या फोटोतलं आहे तसं असणार आहे. झी युवावरील आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय' मध्ये लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या या मालिकेची शैली विनोदी असून पम्मी हि या मालिकेला ग्लॅमरचा तडक देणार आहे. हि मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.


नवी मालिका तुझं माझं जमतंय यामध्ये अपूर्वाचे सहकारी कोण असतील ते मात्र गुलदस्त्यात आहे. लवकरच ते कळेल. पण प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यात ती यशस्वी होते का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल. वर म्हटल्याप्रमाणे एक गोष्ट तिच्यासोबत नसेल ती म्हणजे रात्रीस खेल चाले मधले आण्णा नाईक. मालिकाच बदलल्यानं नाईक तिथे नसणार आहेत. पण ती दिसल्यावर लोकांना नाईकांची आठवण येईल यात वाद नाही. आता या मालिकेची वाट पाहायची इतकच प्रेक्षकांच्या हातात.