Anurag Kashyap Vicky Kaushal Chhaava Movie: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' सिनेमा (Chhaava Movie) या वर्षातील सर्वात यशस्वी हिंदी चित्रपटांपैकी (Hindi Film) एक आहे. प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात या सिनेमाची तुफान चर्चा झाली. चित्रपटाच्या कथानकाचं, अभिनयाचं आणि दिग्दर्शनाचं सर्वांनी कौतुक केलं. दरम्यान, चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांनी मात्र, अगदी सर्वांच्या प्रतिक्रियांच्या विरोधात मत व्यक्त केलं आहे. 'छावा' सिनेमा अपेक्षित होता, तितका आवडला नाही, असं अनुराग कश्यप म्हणाले आहेत. अनुराग कश्यप यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अनुराग कश्यप सध्या त्यांचा नवा सिनेमा 'निशांची'मुळे चर्चेत आहेत. सध्या ते त्यांच्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. याचनिमित्तानं दिग्दर्शक, निर्माते अनुराग कश्यप यांनी लल्लंटॉपशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित विविध विषयांवर भाष्य केलं. पण, यावेळी बोलताना अनुराग कश्यप यांनी 'छावा' सिनेमाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
"खाद्याला यातना देऊन जे काही घडत होते, ते मला नाही आवडत..."
यावर्षीचा सर्वात मोठा हिट सिनेमा 'छावा' सिनेमा फारसा आवडला नाही, असं अनुराग कश्यप म्हणाले आहेत. "छावा' पेक्षा मला तो चित्रपट हॉलिवूडच्या 'द पॅशन ऑफ द प्रिस्ट'सारखा वाटला. मला तो आवडला नाही...", असं अनुराग कश्यप म्हणाले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, "मला असं वाटले की, एखाद्याला यातना देऊन जे काही घडत होते, ते मला नाही आवडत, मी बघू शकलो नाही. मी एकतर आता हिंदी चित्रपट पाहणं बंद केलं आहे. 'चमकीला', 'धडक 2', 'लापता लेडीज' काही मोजकेच चित्रपट पाहिले आहेत."
"...पण ती कहाणी सांगण्याची पद्धत मला नाही समजली"
'छावा' सिनेमाविषयी पुढे बोलताना ते म्हणाले की, "ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर मी त्यातली काही दृश्य पाहिली, ज्याविषयी लोक चर्चा करत होते. विनीतसाठी मी ते पाहिले. विकी आणि विनीतचे जे शेवटचे दृश्य होते, ते मी पाहिले. मी याविषयी कोणतेही जजमेंट द्यायचे नाही, पण ती कहाणी सांगण्याची पद्धत मला नाही समजली, इतरांना कदाचित तेच आवडलं असेल."
"विक्की कौशल आणि माझ्यात फारसं बोलणं होत नाही..."
विक्की कौशलबद्दलही अनुराग कश्यप यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, "आता आमच्यात फारसं बोलणं होत नाही. मी त्याला किंवा कोणालाही जज करणार नाही. एखादा माणूस एखाद्या गोष्टीची निवड का करतो? हे त्याच्या स्वत:वरच अवलंबून आहे. मला एखादी गोष्ट सांगायची असेल, तर मी ती सांगतो. पुन्हा-पुन्हा तेच तेच बोलणं आवडत नाही. म्हणूनच मी मुंबई सोडून गेलो..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :