Anurag Kashyap-Amruta Subhash : मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) ही जोडी सगळ्यांनाच माहितेय. अमृता आणि अनुरागने रमण राघव 2.0, चोक्ड आणि सेक्रेड गेम्स यामध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मैत्रीचेही अनेक किस्से या दोघांनीही अनेकदा सांगितलेत. पण अनुरागने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान अमृताचा एक किस्सा सांगितला त्यानंतर अमृताला बरंच ट्रोल करण्यात आलं. पण त्यावर अनुरागने पोस्ट लिहित त्या सगळ्यांना सडेतोड उत्तर दिलं.
अनुरागची ही पोस्ट रिशेअर करत अमृताने देखील त्याचे आभार मानले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या मैत्रीची बरीच चर्चा सुरु आहे. नेमका हा प्रकार काय आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
अनुरागने काय म्हटलं होतं?
अनुरागने एका मुलाखतीदरम्यान अमृताचा एक किस्सा सांगत एजन्सीवर आगपाखड केली होती. त्यामध्ये त्याने म्हटलं होतं की, , अमृता सुभाषसोबत मी तीन वेळेस काम केले आहे. त्यामुळे ती किती साधी आहे हे मला माहित आहे. आम्ही एक प्रोजेक्टवर काम करत होतो आणि अचानकपणे तिच्या मॅनेजरकडून अनेक मागण्यांची यादी आली. ती यादी पाहून मी तू ठीक आहेस ना, असा प्रश्नच त्याला केला. अमृताच्या मॅनेजरने केलेल्या मागणीत तिला सिंगल डोअर व्हॅनिटीपासून वेगवेगळ्या मागण्या होत्या. ती मागण्यांची यादी वाचून मी मॅनेजरला फोन केला आणि अमृताऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला घेतले असल्याचे सांगितले.मॅनेजरला हा निरोप दिल्यानंतर अमृता सुभाषचा फोन आला आणि काय झाले असे तिने विचाराले. तिच्या मॅनेजरने काय काय मागण्या केलेल्या याची तिलाही माहिती नव्हती. शेवटी तिने मॅनेजरला यावरून झापलं
अमृता ट्रोल, अनुरागचे खडेबोल
या गोष्टीमुळे अमृता सुभाषला बरंच ट्रोल करण्यात आलं. लोकांना अनुरागचा मुद्दाच कळला नव्हता. कारण त्याचा रोख हा एजन्सीवर होता, अमृतावर नाही. कारण या सगळ्याची तिलाच कल्पना नव्हती. यामुळे अमृताला ट्रोल करणाऱ्यांना अनुरागने म्हटलं की, माझ्या मुलाखतीनंतर बरेच जण माझी मैत्रिण अमृताला ट्रोल करत आहेत. त्यामुळे ही पोस्ट तेच सांगण्यासाठी आहे की, मी तिचं उदाहरण दिलं होतं. आमच्या दोघांमध्येही विश्वास आणि प्रेम दोन्हीही आहे. हा मुद्दा चोक्ड सिनेमादरम्यानचा होता आणि तिने तो सिनेमा अगदी सुंदररित्या केला. इथे दोष त्या एजन्सीचा होता, ज्यांनी तिच्या नावावरुन एवढ्या गोष्टींची मागणी केली. तिलाही या सगळ्याची कल्पना नव्हती. त्यानंतर तिने लगेचच ती गोष्ट दुरुस्त केली आणि आज तिनेही ती एजन्सी सोडून दिली आहे.
अमृताने अनुरागचे मानले आभार
अमृताने अनुरागचे आभार मानत म्हटलं की, अनुराग मला खूप छान वाटलं. मी खूप हुशारीने मित्र निवडलेत आणि मी भाग्यवान आहे की, तू माझा मित्र आहेस. अमृताने तिची ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.