Ankita Walawalkar Shared Video On Chhatrapati Shivaji Maharaj Gate In Nandgaon: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वातून घराघरांत पोहोचलेली प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) 'कोकण हार्टेड गर्ल' (Kokan Hearted Girl)  अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असते. अंकितानं नुकताच नांदगावच्या प्रवेशद्वाराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव देण्यात आलं आहे. मात्र, त्या ठिकाणी साचलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि घाण पाहून अंकितानं संताप व्यक्त केला आहे. तसेच, व्हिडीओ शेअर करुन त्यावर रोखठोक भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement


प्रत्येकाच्या मनात महाराजांबद्दल एक अभिमान आहे. पण, खरोखर आपण ते जपतोय का? : अंकिता वालावलकर 


इन्स्टाग्रामवर रिल शेअर करत 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर म्हणाली की, "सोशल मीडियावर जर कोणी म्हटलं की, शिवाजी पार्कला हा इव्हेंट होतोय तर आपण त्यांना रागात म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणा, कारण, आपल्या प्रत्येकाच्या मनात महाराजांबद्दल एक अभिमान आहे. पण, खरोखर आपण ते जपतोय का? हे आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार… नांदगाव, इथे असा कचरा केलाय. मला एक सांगा आज महाराज असते तर, ते आज या प्रवेशद्वारातून येऊ शकले असते का? आपण त्यांना येऊ दिलं असतं का? ज्याठिकाणी आपण इतिहासाचं नाव लावतोय जर त्याठिकाणचं सौंदर्य आपल्याला राखता येत नसेल तर, ते नाव लावताय कशाला? आता जे मला सांगतील की, हे तू जाऊन साफ कर त्यांना मला एकच सांगायचंय! कचरा न करणं, कचरा होऊ न देणं आणि ज्याठिकाणी महाराजांचं नाव लागतंय त्या जागेचं पावित्र्य जपणं हीच खरी शिवप्रेमींची ओळख आहे. जर, हे जमत नसेल तर त्याठिकाणी महाराजांचं नाव वापरूच नका. गेले कित्येक दिवस मी हे रोज बघतेय. पण तो कचरा कोणच साफ करत नाहीये."






नाव महाराजांचं… पण समोरचं दृश्य लाजिरवाणं : अंकिता वालावलकर 


इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत अंकिता वालावलकरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "गेटवर नाव महाराजांचं… पण समोरचं दृश्य लाजिरवाणं! एक लक्षात घ्या इतिहास फक्त पुस्तकांत नसतो, तो आपल्या आजुबाजूच्या जागांमध्येही असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर आपल्या अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख जिथे होतो, तिथे आपोआपच अभिमान आणि आदराची भावना जागी होते. परंतु आज अनेक ठिकाणी “शिवाजी महाराज चौक”, “शिवाजी महाराज गेट” अशा ऐतिहासिक नावांखाली असलेल्या जागांभोवती घाण, कचरा, निष्काळजीपणा आणि बेफिकिरीचं दु:खद चित्र दिसून येतं. किती विसंगती आहे ही– एकीकडे महाराजांचा जयघोष, दुसरीकडे त्यांच्या नावाजवळच साचलेला कचरा! हे फक्त त्या जागेचं नाही, तर आपल्या मानसिकतेचंही द्योतक आहे. शिवरायांच्या विचारांनी चालणं म्हणजे फक्त गड किल्ले बघणं नव्हे, तर स्वच्छता, शिस्त, आणि सजग नागरिकत्व हे त्यांच्या आदर्शाचं खरे अनुकरण आहे. मग आपण रोज ज्या गेटखालून पाटीला नमस्कार करतो, तिथं जर आपणच प्लास्टिक, घाण, थुंकी आणि कचऱ्याचा ढीग ठेवत असू – तर तो नमस्कार केवळ दिखावा आहे का?"


"आज गरज आहे ती फक्त 'शिवप्रेम' बोलण्यात नसून, ते कृतीत दाखवण्याची. गेटवर महाराजांचं नाव,पण समोर कचरा – हा अपमान नाही का आपल्या इतिहासाचा?” आपण जर खरंच शिवरायांवर प्रेम करत असू, तर त्यांच्या नावाने असलेल्या प्रत्येक स्थळाला म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला स्वच्छ आणि सन्माननीय ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. समाज, नगरपालिका आणि स्थानिक नागरिक – सर्वांनी मिळून हे लक्षात घ्यायला हवं. शिवरायांचं नाव म्हणजे शौर्य, स्वच्छता आणि स्वाभिमान. तो आपल्या कृतीनं दाखवूया! महाराजांच्या नावाने असलेल्या गेटसमोर कचरा दिसणं, हे आपण सर्वांनी विचार करावा अशी गोष्ट आहे. स्वतः कचरा न टाकणे आणि इतरांनाही रोखणे – हीच खरी शिवप्रेमाची खरी ओळख. -27/07/2025", असं अंकिता वालावलकर पुढे म्हणाली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Milind Gawali On Suraj Chavan Zapuk Zupuk Movie: सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' का चालला नाही? सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी म्हणाले...