Milind Gawali On Suraj Chavan Zapuk Zupuk Movie: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी (Bigg Boss Marathi Season 5) महाराष्ट्रानं 'झापुक झुपूक' स्टार सूरज चव्हाणच्या (Suraj Chavan) हातात दिली. बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतच सूरज चव्हाणला सिनेमाचीही ऑफर मिळाली. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Director Kedar Shinde) यांनी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या अंतिम सोहळ्यातच सूरज चव्हाणसोबत सिनेमात करणार असल्याचं जाहीर केलं. एवढंच काय तर, सिनेमाचं नावंही त्यांनी तात्काळ जाहीर करुन टाकलं. सिनेमाचं नाव 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk Movie) आणि सिनेमाचा हिरो सूरज चव्हाण.
बिग बॉसचं पाचवं पर्व संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे सूरज चव्हाणच्या सिनेमाचं शुटिंग सुरू झालं. सिनेमात सूरज चव्हाणसोबतच दिग्गज कलाकारांची मादियाळी होती. सूरजसारख्या अत्यंत हलाखिच्या परिस्थितीतून आलेल्या मुलाला एवढी मोठी संधी मिळतेय, हे पाहून अवघा महाराष्ट्र खूश होता, सूरजवर कौतुकाचा वर्षाव करत होता. पण, प्रत्यक्षात सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मात्र महाराष्ट्रातील जनतेनं जेवढं प्रेम सूरजला बिग बॉस जिंकण्यासाठी दिलं, तेवढं प्रेम त्याचा 'झापुक झुपूक' सुपरहिट करण्यासाठी मात्र दिलं नाही. प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवल्याचं बॉक्स ऑफिसच्या आकड्यांनी दाखवलं. या सिनेमाचं प्रमोशन जोरदार झालेलं. मात्र, तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. पण, अशातच आता पहिल्यांदाच 'झापुक झुपूक' सिनेमातील कलाकारानं एका मुलाखतीत बोलताना सिनेमावर भाष्य केलं आहे.
मराठी अभिनेते मिलिंद गवळी नेमकं काय म्हणाले?
'आई कुठे काय करते' मालिकेतून पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणारे मिलिंद गवळी यांनी सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांनी 'टेली गप्पा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'झापुक झुपूक' सिनेमावर भाष्य केलं आहे.
मिलिंद गवळी म्हणाले की, "मला असं वाटतं झापुक झुपूक सिनेमा खूप चालला. म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे न बघता या सिनेमाबद्दल लोकांना माहिती नाही असं नाहीये. हल्ली जे सिनेमे प्रदर्शित होतात त्यातले काही सिनेमे कधी आले कधी गेले याबद्दल लोकांना कळत सुद्धा नाही. पण, झापुक झुपूक प्रेक्षकांना माहिती होती. सूरज चव्हाणने झापुक झुपूक नावाचा सिनेमा केला तो महाराष्ट्रात रिलीज झाला. आजच्या सिनेमाचा ऑडियन्स हा वेगळा आहे तर रिल्सवर त्याला लाईक, फॉलो करणारा प्रेक्षकवर्ग हा वेगळा आहे. त्यातील बराचसा ऑडियन्स हा थिएटरमध्ये आला. बऱ्याचशा थिएटरमध्ये सिनेमा हाऊसफुल्ल होता. त्या -त्या भागातील थिएटर्समध्ये सिनेमाचं आणि सूरजच्या कामाचं कौतुकही झालं."
झापुक झुपूक चालला नाही याचं कारण म्हणजे... : मिलिंद गवळी
"झापुक झुपूक चालला नाही याचं कारण म्हणजे प्रेक्षकच सिनेमागृहापर्यंत येत नाही. ओटीटी माध्यमावर दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये नवनवीन सिनेमे बघायला मिळतात. त्यामुळे प्रेक्षक घराबाहेर पडत नाहीत. बरं, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गरीब माणसाला मल्टिप्लेक्स परवडत नाही. तसंच श्रीमंत माणसाला देखील घराबाहेर पडताना विचार करावा लागतो, कारण 4-5 माणसांचं कुटुंब असेल तर त्यामध्ये दोन ते पाच हजार असेच निघून जातात. त्या पाच हजारांमध्ये माणूस पर्याय म्हणून दुसऱ्या गोष्टींबद्दल विचार करतो."
"हल्ली एक ते दीड हजारामध्ये वर्षभरासाठी सबस्क्रिप्शन मिळतं. त्या प्लॅटफॉर्मवर असंख्य सिनेमे पाहायला मिळतात. शिवाय लोकांकडे आता तेवढा वेळही नाही. आता प्रवास करणं देखील खूप अवघड झालं आहे. पूर्वी आम्ही दादरवरून अनेक ठिकाणी सिनेमे बघायला जायचो. आता तुमच्या आजुबाजूला थिएटर्स आले आहेत. सध्या मी ज्या ठिकाणी राहतो तिथे जवळपास 28 थिएटर्स आहेत. त्यामुळे असं वाटतं मनोरंजन हे खूप सोपं आणि खूप महाग झालं आहे. तर ते सगळ्यांनाच परवडत नाही त्यामुळे काय पाहायचं काय नाही हे प्रेक्षक ठरवतो."
दरम्यान, 'झापुक झुपूक' सिनेमामध्ये सूरज चव्हाणसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे अशी तगड्या कलाकारांची स्टारकास्ट होती. या चित्रपटासाठी प्रत्येक कलाकारानं प्रचंड मेहनत घेतली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :