Nag Panchami 2025: नागपंचमी हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्वाचा सण आहे, जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जाते. या दिवशी सर्प (नाग) देवतेची पूजा केली जाते. नागपंचमीच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून काही खास महत्त्व खाली दिले आहे, जाणून घ्या..

नागपंचमीचे धार्मिक महत्व

सर्प देवतेची पूजा

सर्पांना हिंदू धर्मात देव मानले जाते. विशेषतः शेषनाग, वासुकी, तक्षक, कालिया यांचा उल्लेख पुराणांत आहे. भगवान शिवाच्या गळ्यात वासुकी नाग, तर विष्णू भगवान शेषनागावर शयन करतात. म्हणून नागांचे पूजन म्हणजे देवांचे पूजन मानले जाते.

श्रावण महिना आणि सर्प

श्रावण महिना पावसाळ्याचा काळ असतो, यावेळी नागांचे वास्तव्य जमिनीवर होते. म्हणून त्यांना त्रास न होता त्यांचे पूजन केले जाते. मनुष्य आणि सर्प यांचे सौहार्द टिकवण्यासाठी - सर्पांना मारू नये, त्यांच्याशी सहजीवन राखावे हा संदेश नागपंचमी देते.

पुराणांतील उल्लेख

महाभारतातील कथा: परिक्षित राजाने शमीक ऋषींचा अपमान केल्यामुळे तक्षक नावाच्या नागाने त्याला विष दिले होते. त्याच्या नंतर जनमेजय राजा याने नाग यज्ञ करून अनेक नाग मारले. तेव्हा अस्तिक ऋषीने यज्ञ थांबवला, आणि त्यादिवशी पंचमी होती. म्हणून त्या दिवसापासून नागपंचमी साजरी केली जाते.

नागपंचमीच्या दिवशी काय करतात?

  • नागाचे चित्र किंवा मूर्ती तयार करून त्यास दूध, फुले, हलदीकुंकू, अक्षता अर्पण केली जाते.
  • काही ठिकाणी नागाच्या बांधावर किंवा नागदेवतेच्या मंदिरात जाऊन पूजा केली जाते.
  • दूध-लाह्या (लाह्या आणि दूध) नागाला अर्पण केल्या जातात.
  • सर्पदंशाचा धोका टाळण्यासाठी मंत्रोच्चार आणि नाग मंत्र देखील उच्चारले जातात.
  • काही घरांमध्ये भिंतीवर नागाचे चित्र काढून पूजा केली जाते.

आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व

  • कालसर्प दोष निवारणासाठी नागपंचमी हा दिवस फार शुभ मानला जातो.
  • या दिवशी नाग मंत्र, राहू-केतू शांति, महामृत्युंजय जप केल्यास सर्पदोष नष्ट होतो असे मानले जाते.
  • संतान प्राप्ती, आरोग्य, संपत्ती, आणि कुंडलीतील सर्पदोष निवारण यासाठी नागपंचमी अत्यंत लाभदायक मानली जाते.

निष्कर्ष:

नागपंचमी म्हणजे निसर्ग, देव, प्राणी आणि मानव यांच्यातील सौहार्दाचे प्रतीक. सर्प पूजन हे केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाशी सुसंवादाचे प्रतीक आहे.

डॉ भूषण ज्योतिर्विद

हेही वाचा :           

Nag Panchami 2025: यंदा नागपंचमीला 1 नाही, तर 3 जबरदस्त योग बनतायत! 'या' 3 राशींचं होणार चांगभलं, वाईट दिवस संपलेच म्हणून समजा...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)