Dharmaveer : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारलेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. व्यक्ती, कार्यकर्ता आणि राजकीय नेता अशा विविध रुपातील आनंद दिघे यांचा जीवनपट ‘धर्मवीर’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर लवकरच येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.



अनेक नाटकं, चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून आपलं अभिनेता म्हणून स्थान निर्माण केलेले मंगेश देसाई (Mangesh Desai) साहिल मोशन आर्टस् या निर्मिती संस्थेतर्फे ‘धर्मवीर’ या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी मंगेश यांनी अतिशय आव्हानात्मक विषयाची निवड केली आहे.


प्रविण तरडे सांभाळणार लेखन-दिग्दर्शनाची धुरा!


‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटानंतर ‘धर्मवीर’ चित्रपटाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी प्रविण विठ्ठल तरडे (Pravin Tarde) सज्ज असून, लेखन आणि दिग्दर्शन हे त्यांचे आहे.  केदार गायकवाड सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहत असून, या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार? हे अद्याप मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.


‘धर्मवीर’ चित्रपटासाठी काही दिवसांपूर्वी निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता.चित्रपटाचं चित्रीकरण सध्या ठाणे येथे सुरू झालं आहे. आनंद दिघे यांच्यासह महत्त्वाच्या भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार याची आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha