Shivpratap Garudjhep : रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या विजया दशमीच्या मुहूर्तावर अर्थात 5 ऑक्टोबर 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते-निर्माते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kholhe) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे.


नुकतीच डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाची एक व्हिडीओ झलक शेअर करत, चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे जाहीर केले आहे. ‘विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मराठी मातीचा संस्कार, चित्रपटगृहांत अनुभवा आग्राभेटीचा थरार!’, असे कॅप्शन देत हा उत्कंठावर्धक टीझर शेअर करण्यात आला आहे.


पाहा पोस्ट :



'शिवछत्रपती' आणि 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हटलं की, डॉ. अमोल कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या मनात येतं. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


‘बम बम भोले’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती


काही दिवसांपूर्वी 'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटामधील 'बम बम भोले' हे गाणं रिलीज झाले होते. या गाण्यालाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याचे गीतकार ऋषीकेश परांजपे हे आहेत, तर गाण्याला संगीत शशांक पोवार यांनी दिले आहे. प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणे गायले आहे. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर हे संपूर्ण गाणं शेअर केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या गाण्याला लाइक आणि कमेंट्स करुन अमोल कोल्हे यांना या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


'शिवप्रताप-गरुडझेप' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा कार्तिक राजारामने सांभाळली आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. तसेच, हा चित्रपट 'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत असणार आहे. मराठी स्वाभिमानाचा अंगार...काल, आज आणि उद्याही असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा थरार आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.


हेही वाचा :


Shivpratap Garujhep : 'या हिंदुस्थानानं अनुभवला होता हा शिवप्रताप'; अमोल कोल्हेंनी शेअर केला 'शिवप्रताप - गरुडझेप' चित्रपटाचा टीझर