Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) लवकरच नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, आता त्यांच्या या चित्रपटावरुनच एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. अमोल कोल्हेंचा हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.


मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अमोल कोल्हे यांच्या या चित्रपटावर राजकारणातील काही दिग्गज नेत्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, या चित्रपटावर अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?


2017 मध्ये या सिनेमाचं चित्रीकरण झालं, जेव्हा मी सक्रीय राजकारणात नव्हतो, किंवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत नव्हतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी भूमिका करतो म्हणजे त्याच्या विचारधारेशी 100 टक्के सहमत असतो असंच नाही. काही भूमिकांशी आपण सहमत असतो, तर काहींशी आपण विचारधारेंशी सहमत नसतानाही भूमिका करतो. मुळात माझ्या व्यक्तीगत आणि सार्वजनिक आयुष्यात नधुराम गोडसेंच्या  उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधी हत्येच्या समर्थनार्थ भूमिका कधीही घेतली नाही.


त्यामुळे केवळ एक कलाकार म्हणून भूमिका वटवणं आणि त्याचा राजकीय विचारांशी संबंध जोडला जाणं मला वाटतं या दोन विभिन्न गोष्टी आहेत. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. एखाद्याला एक गोष्ट मांडायची आहे, आणि कलाकार म्हणून ते माझ्याकडे आले आणि मी ती भूमिका केली. इतकी साधी ती गोष्ट आहे. त्या विचारधारेचा जेव्हा मी प्रचार करतो, तेव्हा माझी विचारधारा काय आहे ती वेगळी गोष्ट आहे. मला वाटतं व्यक्ती म्हणून मला वैचारिक स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या दोन्हीचा आदर मी करतो.



सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. 2017 मध्ये म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी केलेला हा सिनेमा आहे. त्यामुळे सिनेमात नेमकं काय आहे हे 30 तारखेला सिनेमा रिलीज झाल्यानंतर मला कळणार आहे. माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे, कलाकार आणि राजकीय भूमिका या दोन गोष्टींची गल्लत केली जाऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे आणि सुजाण नागरिक ही गोष्ट पाळतील अशी माझी खात्री आहे.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha