Amishort 2023 : मुंबईतील ‘ॲमिटी’ युनिव्हर्सिटीमध्ये नुकतंच ‘ॲमिशॉर्ट 2023’ (Amishort 2023) हा पहिलावहिला आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव पार पडला. या महोत्सवात जगभरातील निवडक पुरस्कारप्राप्त लघुपट विद्यार्थ्यांसमोर दाखवण्यात आले. अभिनेत्री तनिशा मुखर्जीच्या (Tanisha Mukherjee) ‘अग्नी दाह’ (2022) या चित्रपटाने या दोन दिवसीय महोत्सवाला सुरूवात झाली. यंदा ‘ॲमिशॉर्ट 2023’मध्ये फोकस कंट्री म्हणून इराणचे पाच लघुपट (Short Films) दाखवण्यात आले. इराण कल्चर हाऊस, मुंबईचे संचालक ओमानोल्लाह सयादी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. शिवाय जर्मनी, अमेरिका, अर्जेंटिना या देशातल्या सिनेमांसहित भारतातल्या पुरस्कार विजेत्या सिनेमांचा समावेश करण्यात आला.


प्रसिद्ध लेखक आणि सिने-समीक्षक अशोक राणे महोत्सवात पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘लघुपट ही फिचर फिल्म बनवण्याकडे वळण्याची पहिली पायरी नाही. तर लघुपटाचं वेगळं मार्केट जगभरात आहे. तरुण विद्यार्थ्यांनी या मार्केटचा अभ्यास करावा. पण फक्त फिल्म बनवून विकण्यापेक्षा ती तयार करण्याची प्रक्रिया आयुष्यभर पूरणारा अनुभव देऊन जाते’.


कुलगुरू डॉ. ए. डब्ल्यू. संतोषकुमार यांनी आपलं मत मांडताना म्हणाले, 'ॲमिटी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नाळ जागतिक सिनेमांशी जोडण्याचा प्रयत्न आहे. जगभरात नक्की काय सुरू आहे, वेगवेगळ्या देशातल्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी आणि याबद्दल तिथल्या सिनेमांत दिसणारं या सर्वांचं प्रतिबिंब हे या फेस्टिव्हलच्या निमित्तानं अनुभवण्यास मदत झाली.'


दिग्दर्शक योगेंद्र चौबलसोबत अभिनेत्री तनिशा मुखर्जी, चंद्रकांता फेम यक्कू म्हणजेच अभिनेता अखिलेंद्र मिश्रा, ‘डॉक्टर जी’ (1999) सिनेमाफेम अभय चिंतामणी मिश्र आणि जिग्ना त्रिवेदी यांनीही या लघुपट महोत्सवाला उपस्थित होते. तुकाराम सिनेमानं 1939 मध्ये व्हेनीस आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल गाजवला. हे सांगताना मिश्रा यांनी ‘लगान’, ‘लंच बॉक्स’ आणि आता आलेल्या ‘कांतारा’ सिनेमांची उदाहरणं दिली. सिनेमा आपल्या मातीशी जोडणारा हवा. म्हणजे अगदी जगातल्या प्रत्येक माणसाला कनेक्ट करतो हे अखिलेश मिश्रा यांनी स्पष्ट केलं.


‘वारसा’ (2022) या फिल्मद्वारे महोत्सवाची सांगता झाली. पुढील वर्षीपासून आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित करण्याचा ॲमिटी विद्यापीठाचा प्रयत्न असल्याची माहिती कुलगुरू डॉ. संतोषकुमार यांनी यावेळी दिली.











महत्त्वाच्या बातम्या :


Akshay Kumar : 'सेल्फी किंग' अक्षय कुमार; तीन मिनिटांत घेतल्या तब्बल 184 सेल्फी; मोडला 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'