Mumbai: मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरळीत व्हावा यासाठी लवकरच तब्बल 5.56 किलोमीटर लांबीचा पूल अर्थात मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. 5 हजार 560 मीटर लांबीचा हा पूल प्रत्यक्षात आणण्यासाठीची प्रशासकीय कार्यवाही महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी केली आहे. तसेच याबाबतची निविदा नुकतीच प्रकाशित झाली आहे. निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाल्यापासून बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 42 महिन्यांचा कालावधी अंदाजित आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्याद्वारे देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पूल खात्याद्वारे सांगितलं आहे की, प्रस्तावित मार्ग हा दक्षिण मुंबईतील (Mumbai) पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजिक सुरु होणाऱ्या या ईस्टर्न फ्री-वे येथून प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग ग्रँट रोड स्टेशन परिसरापर्यंत असणार आहे. ईस्टर्न फ्री-वे ते ग्रँटरोड स्टेशन परिसर या सुमारे 5.56 किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या 30 मिनिटे ते 50 मिनिटे एवढा कालावधी लागतो. मात्र भविष्यात हे अंतर कापण्यासाठी हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्यानंतर तेवढ्याच अंतरासाठी केवळ 6 ते 7 मिनिटे लागतील. ही बाब लक्षात घेता दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत व अधिक सुलभ करण्यासह अधिक वेगवान होण्यासही या प्रस्तावित मार्गामुळे मोठे बळ मिळणार आहे, असा विश्वासही पूल खात्याद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.
ईस्टर्न फ्री-वेला (eastern freeway) जोडलेल्या पी. डिमेल्लो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित मार्ग (पूल) हा अत्यंत आवश्यक आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांचा प्रवास अधिक सुखद होवून दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणी उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यास मदत झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रस्तावित मार्गाच्या उभारणींनंतर ईस्टर्न फ्री-वेवरील वाहतूक अधिक सुरळीत होऊन प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच सागरी किनारी रस्त्याला ईस्टर्न फ्री-वेशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्वाचा दुवा ठरणार आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, पी. डिमेलो रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH), ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल या भागातील; म्हणजेच दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत, अधिक सुलभ व अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.