Amhi Jarange : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'आम्ही जरांगे' (Amhi Jarange) हा सिनेमा येत्या 21 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्डाकडून या सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे. यासंदर्भात सिनेमाच्या दिग्दर्शक योगेश भोसले यांनी पोस्ट लिहित प्रेक्षकांना आवाहन देखील केलं आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्याचा इतिहास आम्ही जरांगे या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. सुरुवातीला हा सिनेमा 14 जून रोजी प्रदर्शित होणार होता. पण त्याच जोडीला आलेल्या संघर्षयोद्धा मनोज जरांगे सिनेमाने त्यांची प्रदर्शनाची तारीख बदलली. त्यामुळे या सिनेमालाही त्यांची प्रदर्शनाची तारीख बदलावी लागली. आता सेन्सॉर बोर्डाकडूनही प्रदर्शन थांबवण्यात आलं असल्यामुळे या सिनेमाला आता प्रदर्शनाची आणखी वाट पाहवी लागणार असल्याचं म्हटलं जातंय.
दिग्दर्शकांनी काय म्हटलं?
दिग्दर्शकांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'महाराष्ट्रात आपल्याच हक्कांसाठी, मराठा समाजाच्या न्याय अधिकारांसाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना संघर्ष करावा लागतोय. याच आंदोलनाच्या संघर्षाचा धगधगता इतिहास जगापुढे मांडण्यासाठी आज सेन्सर बोर्ड सोबत आपल्या ' आम्ही जरांगे ' या सिनेमाला ही संघर्ष करावा लागत आहे. पण एक लक्षात घ्या. संघर्ष जरी असला तरी विजय हा नेहमी सत्याचा आणि चांगल्याचा होतो. आमचा हेतू हा इतिहास आणि संघर्ष जगापुढे आणणे हा आहे. आणि तो नक्की पूर्ण होईल. ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्यापाठी संपुर्ण समाज ढाल बनून उभा आहे तसाच तो या सिनेमाच्याही पाठीशी ऊभा राहील अशी खात्री आहे. लवकरच येत आहोत नव्या तारखेसह तुमच्या भेटीला!'
मकरंद देशपांडे मनोज जरांगेंच्या भूमिकेत
या सिनेमात अण्णासाहेब पाटलांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याचा इतिहास देखील दाखवण्यात आला आहे. यामध्ये अण्णासाहेब पाटलांची भूमिका अजय पुरकर साकारत आहेत. तसेच मनोज जरांगे यांची देखील भूमिका या सिनेमात असून मकरंद देशपांडे हे मनोज जरांगेंच्या भूमिकेत दिसणार आहेत.